प्रा. अशोक पवार यांचे ६८ व्या वाढदिवसानिमित्त पार पडला व्याख्यान कार्यक्रम; कार्य गौरव म्हणून सन्मानपत्र, शाल देऊन सत्कार

अमळनेर : इतिहासाची मोडतोड करून चुकीचे प्रबोधन केले जाते ते थांबविणे गरजेचे आहे. चुकीचा इतिहास सांगून समाज मन बिघडवले जाते. समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढायचा असेल तर सत्य इतिहास सांगितला गेला पाहिजे असे विचार सुप्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गुरुवर्य प्रा. अशोक पवार यांचे ६८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात व्यक्त केले. सोबत विचारमंचावर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, प्रा. अर्जुन कोकाटे, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. अशोक पवार, सौ. मानसी पवार उपस्थित होते. बहुजन समाज सुधारक आई जिजाऊ, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. सौ वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली तर गौतम मोरे यांनी व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचा परिचय करून दिला.
प्रा. श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतर प्रा. अशोक पवार हे आता शाळा कॉलेज बाहेर चे शिक्षक आहेत. त्यांचे विविध पैलू उलगडत त्यांचे कामाचे कौतुक केले व ते १०० वर्षे जगणार असा आशावाद व्यक्त केला. जे सतत काम करतात ते कर्तृत्ववान लोक कधीही सेवानिवृत्त होत नाहीत. हे सांगताना वयाची पंच्याहत्तरी, शंभरी पार करुनही सतत कामात झोकून देणाऱ्या आदरणीय शरद पवार ८३, केशवराज धोंगडे १०१, शरद पाटील ९०, गणपतराव देशमुख ७५, उज्वल सिंग ९९ यांचे कार्य कर्तृत्वाचा आलेख मांडला. आपल्या देशात अनेक भेद आहेत. देश वाचविण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज आहे. जो देश आपला इतिहास विसरतो, तो देश इतिहास घडवू शकत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. राजर्षी शाहू महाराज म्हणत, कर्मवीर भाऊराव पाटील यांना परीक्षेत कमी गुण असले तरी पण ते हुशार, गुणवंत आहेत. त्यांचेकडे चांगले विचार आहेत. मिळणारे मार्कांचा व गुणवत्तेचा संबंध नाही असे सांगताना न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून इतिहास घडविला. दादा कोंडके, अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला, नागराज मंजुळे आदींचा सकारात्मक दृष्टिकोन मुळे त्यांनी देशभर नावलौकिक मिळविल्याचे सांगितले. हे सांगताना बुध्द, अण्णाभाऊ साठे यांचे विचार देखील सांगितले.
अंधश्रद्धेवर बोलताना म्हणाले की, राशिभविष्य एक थोतांड असून कर्तृत्व हेच श्रेष्ठ आहे. लग्नाच्या वेळी मुला मुलीचे गुण, कुंडली पाहण्यापेक्षा त्यांचे वर्तन, गुणवत्ता व कर्तृत्व पहा. एखाद्या गरजूला मदत करणे म्हणजे पुण्य तर एखाद्या ला वाऱ्यावर सोडणे म्हणजे पाप आहे. पण.. आज पाप पुण्याची व्याख्या बदललेली दिसते. जागा, दिशा, वार वाईट नाहीत माणसाने त्यांना सोयीने नाव दिलेले आहे. मानव यातच गुरफटून गेला आहे. नियमित व उपवासाचे आहाराबाबत काही टीप्स दिल्या. स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखान अफजलखान शी लढा देत असताना ३३ कोटी देव असताना कुठे होते ? छत्रपती स्वतः तलवार व आपल्या मावळ्यांना घेऊन कर्तृत्व निभावत होते यामुळे छत्रपती ३३ कोटी देवा पेक्षा मोठे असल्याचे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते. यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शाळा सुरु केली. छत्रपतींचे नाव बदलण्यासाठी त्यावेळी आलेल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी स्वाभिमान राखला. खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस कसा ? वास्तविक राधाकृष्णन यांचा जन्म देखील महात्मा फुलेंनी शाळा सुरु केल्यानंतर कित्येक वर्षांनी झाल्याचे इतिहास उलगडून सांगितले. पण चुकीचे प्रबोधन केले जाते. मंदिराचा पैसा शिक्षणावर खर्च करणारे छत्रपती शाहू महाराज देशातील पहिले राजे होते. त्यांचे काळात शिक्षणावर २३ टक्के खर्च होता आता फक्त तीन टक्केच खर्च होतो. राजकारणात स्वार्थ व सत्तेसाठी सर्व एकत्र येतात, स्वाभिमान उरलेला नाही. छत्रपती शाहू राजांनी प्राथमिक शिक्षण मोफत दिले. सर्व समाजाला आरक्षण दिले. आताचे राजकीय नेते समाजाला काय आरक्षण देणार ? अशी टिप्पणी केली. स्त्री पुरुष भेदभाव, स्त्रियांना मंदीरात प्रवेश बंदी यावरही सविस्तर माहिती देत स्त्रियांचे महत्व पटवून दिले.
कृतज्ञता व्यक्त करताना प्रा. अशोक पवार म्हणाले की, आज माणूस नैराश्य, ताण तणाव, अस्वस्थता यात गुरफटलेला आहे. यासाठी महापुरुष वाचले पाहिजे व चळवळीत आले पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोक संघर्ष संघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदे, प्रा. लिलाधर पाटील, अर्जुन कोकाटे, महेंद्र बोरसे यांनी प्रा. अशोक पवार यांचेविषयी मनोगत व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी, समाधान धनगर, नितीन निळे, मच्छिंद्र लांडगे, चेतन शहा, भारती गाला, गौतम मोरे, जयवंतराव पाटील, प्रा. एस. टी. माळी यांनी प्रा. अशोक पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानपत्र, शाल देऊन सत्कार केला. रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा कल्याण प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तथा विविध संघटनांचे पदाधिकारी, महिलावर्ग, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.