महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारे भाजपचे विचार; आगामी निवडणुक २०२४ ला युवावर्ग क्रांती करणार : आमदार रोहित पवार

अधिवेशनात कापूस व कांदा प्रश्नावर डोक्यावर कापसाची टोपी व गळ्यात कांद्याची माळ घालून घोषणा देणाऱ्यांना आता शेतकरी दिसत नाहीत


अमळनेर : भाजप सरकार व अजित पवार गटाचे मंत्री यांचेवर शब्दांचा भडीमार करत शेतकरी, कष्टकरी मतदारांना विसरणाऱ्या स्वार्थी नेत्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. आगामी निवडणुकीत २०२४ ला युवावर्ग क्रांती करणार असा आशावाद साहेबांचा संदेश देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. जळगाव  येथे सागर पार्कवर दिनांक ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नाट्यगृहात रविवारी आयोजित केलेल्या साहेबांचा संदेश या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील व शहराध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांनी त्यांना शेतकऱ्यांचा आसूड (चाबूक) देऊन स्वागत केले. बैलगाडी, बॅट देऊन काँग्रेस आणि शिवसेनेतर्फेही स्वागत करण्यात आले. मंचावर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जयदेव गायकवाड, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, महेश तपासे, राजा राजापूरकर, कविता म्हेत्रे, पंकज बोराडे, उमेश पाटील, रिटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील आदी उपस्थित होते. सौ. वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले.

आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, संघर्षाची सुरुवात झाली आहे.आपल्याला लढायचे आणि जिंकायचे आहे. येथील मंत्री हवेत गोळी मारणारा नेता आहे. पवार साहेबांनी शिव शाहू फुले आंबेडकर यांचे पुरोगामी परिवर्तनवादी विचार पेरणी करुन पक्ष वाढविला. ज्यावेळी शरद पवार साहेबांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देत निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा येथील आमदाराने स्वतः राजीनामा देत साहेबांवर दृढ निष्ठा दाखवली आणि आज तेच साहेबांची साथ सोडून विरोधकांसोबत सत्तेत जाऊन बसले हे कशासाठी ? अधिवेशनाच्या वेळी विरोधी पक्ष नेता पेक्षाही आग्रही भूमिका घेत कापूस कांदा प्रश्नावर डोक्यावर कापसाची टोपी व गळ्यात कांद्याची माळ घालून घोषणा देत शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर आता शेतकरी दिसत नाहीत का ? यावर्षी गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे तर मग आता मंत्री असतानाही मागे का ? जिल्ह्यात तीन मंत्री असूनही दुष्काळाबाबत आढावा बैठक का नाही ? असे सवाल त्यांनी केले. अनेक लोकप्रतिनिधी भाजपकडे स्वार्थासाठी गेले. याच भाजप वाल्यांनी खालच्या पातळीवर जाऊन तुकोबाराय, छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचेसारख्या महापुरुषांचा अवमान केला, महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला वळविले असे आरोप करणारे हेच लोक आज भाजपला जाऊन मिळाले हे मतदार ओळखून आहे. जालना येथे मराठा समाज आरक्षण करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज बद्दल निषेध व्यक्त केला. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी रक्कम म्हणजे लूट असल्याचे सांगितले. तालुक्यात परिवर्तनाची संधी आहे त्यासाठी येत्या ५ तारखेला दुपारी २ वाजता जळगाव येथे सागर पार्कवर साहेबांचा संदेश ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

माजी मंत्री सतीश पाटील सी एम चा अर्थ सांगताना CM  म्हणजे.. ‘चाट माऱ्या’ असे सांगत म्हणाले की, शरद पवार साहेबांकडून मी स्वाभिमानाचा मंत्र शिकलो. मलाही भाजपकडून मंत्रीपदाची ऑफर असताना मी निष्ठेला बगल दिली नाही. शरद पवार माझ्या गळ्यातील ताईत असून त्या ताईतला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास ते हात कापले जातील असा इशाराही त्यांनी दिला. सौ. तिलोत्तमा पाटील म्हणाल्या की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला कलंक लागतांना दिसत असल्याने आपल्याला धनशक्ती विरोधात लढायचे आहे असे आवाहन केले. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगन्नाथ आप्पा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या, राजा राजापूरकर, जयदेव गायकवाड, कविता म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. संवाद मेळाव्यास शहर व ग्रामीण भागातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!