खासदार उन्मेष पाटील यांना केला प्रश्नांचा भडीमार
अमळनेर : तालुक्यातील पाडळसे धरणाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली असती तर केंद्राच्या बळीराजा सिंचन योजनेतून निधी मिळाला असता असे म्हणणाऱ्या खासदारांनी केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी कोण आमदार, कोण खासदार कमी पडले ? आमदार, खासदार कोणत्या पक्षाचे होते ? याचा उल्लेख खासदारांनी अमळनेर येथील पत्रकार परिषदेत केला नाही. २०१४ पासून राज्यात व केंद्रात भाजप सरकार आहे. मा.उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही हा आरोप खासदार उन्मेष पाटील यांना शोभत नाही. मा उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही, खानदेश वर अन्याय केला तेव्हा खासदारांनी आंदोलन का केले नाही ? तत्कालीन जलसंपदा मंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांना खासदारांनी किती वेळा पत्र व्यवहार केला हे त्यांनी जाहीर केले नाही. २०१४ ते २०१९ या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असतानाही पाडळसे धरण पूर्ण झाले नाही याचा उल्लेख खासदार का करीत नाहीत ? अमळनेर तालुक्यात फक्त पंधरा टक्के सिंचन आहे हे सांगणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांनी पाडळसे धरणाच्या प्रश्नाला फारसे महत्त्व दिले नाही. शेतकऱ्यांच्या वेदनांशी नाते जोडले नाही व धरणाला राजकीय आश्रय मिळवून दिला नाही.
शासकीय अधिकाऱ्याकडून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अडचणी निर्माण होतात. २२ स्मरणपत्रे पाठविली हे सांगणाऱ्या उन्मेष पाटलांचे अधिकारी ऐकत नाही हीच त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. मग एक तर अधिकाऱ्यांना सरळ करा किंवा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा. नाही तर आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या यापैकी कोणताही पर्याय खासदार निवडत नाही याचे आश्चर्य वाटते. संकल्प चित्रा बाबत चुकीची माहिती देण्यात आली. संकल्प चित्रावरून जे नुकसान झाले त्यास कोण जबाबदार आहे ? याची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी खासदार काय करणार आहेत ? शेतकरी म्हणून मी आंदोलनात सहभागी होईल हे सांगणाऱ्या उन्मेष पाटील यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा. मग.. शेतकरी म्हणून आंदोलनात सहभागी व्हावे. उच्च विद्याविभूषित, शेतकरी खासदार असताना अमळनेरच्या पत्रकार परिषदेत मी खासदार म्हणून पाडळसे धरणासाठी काहीही करणार नाही व मी लायक लोकप्रतिनिधी नाही हीच जाहीर कबुली खासदारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…..
पाण्याच्या महत्वाच्या प्रश्नाबाबत शेतकरी व उद्योग विरोधी भूमिका घेणाऱ्या उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारत जोडो अभियान अमळनेर दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करणार आहे. तरी सर्व पाडळसे धरण प्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भारत जोडो अभियान चे प्रमुख प्रा. अशोक पवार यांनी केले आहे.