शाळेतील दहावीचे विद्यार्थी शिक्षकाच्या भूमिकेत
अमळनेर : महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे नुकताच महात्मा फुले स्मृतीदिन ‘शिक्षक दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. सुरुवातीला महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. विचारपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, अरविंद सोनटक्के, एच. ओ. माळी, भाऊसाहेब एन. जी. देशमुख उपस्थित होते.
प्रथम सत्रात इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिपायापासून मुख्याध्यापक, शिक्षकाची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. मुख्याध्यापकाची भूमिका दहावीची श्वेता बैसाणे (इंग्रजी) तसेच शिक्षक भूमिका जयश्री पाटील (मराठी), वैष्णवी माळी (हिंदी), भाग्यश्री पाटील (विज्ञान), गायत्री भिल (गणित), धनश्री वैराळे (इतिहास), आकांक्षा जाधव (भूगोल), भावेश माळी (भूगोल) यांनी केली. नितेश वसावे ने शिपाईची भूमिका पार पाडली. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर. महाजन यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या व महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांचे सहकार्य लाभले.