मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर आहे स्पर्धेचे प्रायोजक

अमळनेर : देशातील क्रमांक १ ची पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मिडिया व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पंधरा वर्षावरील मुली व महिलांसाठी तीन किलोमीटर अंतराची खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड धारक असलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण होईल. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ५००० रुपये, द्वितीय ३००० रुपये, तर तृतीय १००० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. स्पर्धकांनी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणावे. स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ८ ते ९ या वेळेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप चौक ते धुळे रस्त्यावरील कलागुरू मंगल कार्यालय व तेथून परत महाराणा प्रताप चौक असा स्पर्धेचा मार्ग असेल. क्रीडा क्षेत्रातील नवोदित विद्यार्थिनी व महिलांना प्रेरक ठरणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जयंतलाल वानखेडे, उमेश धनराळे, उमेश काटे, बापूराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा.