भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पातोंडा येथील तिर्थक्षेत्र माहिजी देवी यात्रोत्सव सुरु

माहिजी देवी मंदिराचे रुप पालटण्यासाठी देवस्थानचे पदाधिकारी व भाविकांंचे विशेष योगदान

पातोंडा : परिसरातील भाविकांसह खानदेश, गुजरात व मध्य प्रदेश मधील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र माहिजी देवीचा यात्रोत्सव दिनांक २५ जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे. अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावच्या उत्तरेस माहिजी देवीचे भव्य पुरातन मंदिर असून देवी सिंहावर आरुढ असलेली मूर्ती अखंड दगडात कोरलेली आहे. सप्तशृंगी देवीचे प्रतिरुप म्हणून या देवीची ख्याती आहे. मंदिराच्या आवारात परशुरामाचे मंदिर, प्रवास करीत असतानाचे राम, लक्ष्मण, सीता व नावाड्या यांचा देखावा आहे. परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी मंगल कार्यालय देखील आहे.

प्राचीन काळात मंदिराच्या जागेवर एक मोठा वडाचा वृक्ष होता. या वृक्षाखाली उदासी नावाच्या तपस्वी महाराजांची पर्णकुटी होती. सभोवताली पडीक शेत जमीन होती. या शेत जमिनीची मशागत करीत असताना शेतकऱ्याला त्रिशूलच्या आकाराच्या दगडाचे सुरेख असे बाण सापडल्याचे सांगितले जाते. सप्तशृंगी देवीला सात बहिणी असून सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी. सर्वात लहान असल्याने तिला ‘लघु माहिजी’ असेही समजले जाते. अशी आख्यायिका पर्णकुटीत वास्तव्यास असलेले उदासी महाराज सांगत. अमळनेर येथील दानशूर प्रताप शेठजी यांनी कळस असलेले हे मंदिर बांधून दिले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी कै. जगन्नाथ वामनराव ठाकूर यांनी निधी जमा करून बांधकामाला अग्रक्रम देऊन मंदिर परिसराची शोभा वाढवली आहे. मंदिर देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्र योजनेअंतर्गत २००८ मध्ये ‘क’ वर्ग तर २०२२ मध्ये ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. १० ते १५ दिवस सुरु असणाऱ्या या यात्रेत विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांसह संसार उपयोगी वस्तू, पूजा साहित्य असलेली दुकाने थाटली जातात. यात्रेत नवस करण्यासाठी विविध ठिकाणांहून असंख्य भाविकांची गर्दी असते. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम केले जातात. देवीचा मान म्हणून तगतराव मिरवणूक काढली जाते. माहिजी देवी मंदिराचे रुप पालटण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष दिनेश बिरारी, सचिव भूषण बिरारी, विश्वस्त प्रशांत बोरसे, दीपक सूर्यवंशी, सुरेश पालखे, रावण बाविस्कर, प्रविण पवार, धर्मदास चौधरी व नरेंद्र सैंदाणे आदी पदाधिकारी व भाविकांंचे विशेष योगदान आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!