पाडळसरे धरण जन आंदोलन समितीतर्फे अ. भा. मराठी साहित्य संमेलन व विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीला निवेदन

अमळनेर : शहरात संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व विद्रोही मराठी साहित्य संमेलनात तापी नदीवरील खान्देशातील शेतकरी कष्टकरी जनतेच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत शासनाने समावेश करण्याचा ठराव संमेलन संयोजकांनी करावा अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली.

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे पदाधिकारी यांनी नुकतीच अ. भा. मराठी साहित्य संमेलन आयोजक मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांची प्रताप महाविद्यालय येथे संमेलन स्थळी भेट घेऊन पाडळसरे धरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने तातडीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी केंद्राकडे पाठवावा व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत सदर धरणाचा समावेश होऊन धरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू व्हावे अशी मागणी केली आहे. डॉ.अविनाश जोशी यांनीही सदर विषयावर चर्चा करू व निर्णय घेऊ असे आश्वासन समितीला दिले.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील, निमंत्रक रणजित शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही सदर मागणीचे निवेदन देण्यात येऊन चर्चा करण्यात आली व खानदेश मधील सहा तालुक्यांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी संयोजकांनी आपल्या संमेलनाच्या अजेंड्यावर सदर ठराव घ्यावा अशी विनंती केली.

यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोर ढमाले यांनी विद्रोही संमेलनामध्ये शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य असल्याने धरण संदर्भातला ठराव निश्चितपणे केला जाईल असे आश्वासन संमेलन संयोजन समितीच्या वतीने दिले.

यावेळी जन आंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, महेश पाटील, संजय पूनाजी पाटील, प्रविण संदांनशिव, ॲड. रज्जाक शेख, दिपक भोई, सुशील भोईटे, पुरुषोत्तम शेटे, सुधाकर मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जन आंदोलन समितीच्या वतीने एलगार गझल संमेलनातही पाडळसरे धरणा बाबतचा ठराव व्हावा म्हणून खानदेश साहित्य मंचचे अध्यक्ष व एल्गार गझल संमेलनाचे संयोजक सदाशिव सूर्यवंशी, संयोजक शरद धनगर यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!