
अमळनेर : महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या अनुदानित शेडनेट, पॉली हाऊस उभारणीत जळगांव, धुळे, नंदुरबार, अ.नगर, नाशिक आदी ठिकाणी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शिवसेना (उबाठा) चे अनंत निकम यांनी संबंधितांकडे यापूर्वी केला आहे. या कथित घोटाळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सदर घोटाळ्याची कसून चौकशी होऊन संबधित भ्रष्ट लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. तथापि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा तालुक्यातील शेडनेट पॉली हाऊस कथित घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ होत असल्याने सचिन बाळू पाटील, अनंत निकम, कैलास दगा पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी तहसील कार्यालया समोर प्रशासनाच्या नाकर्तेपणा विरोधात आज प्रजासत्ताक दिनी स्वतःला जमिनीत गाडून आगळे वेगळे आंदोलन केले. या प्रसंगी आंदोलकांना समर्थन देण्यासाठी अनेक शेतकरी उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारने जागतिक बँकेकडून साडे चार कोटी चे कर्ज घेऊन दुष्काळी गावांमध्ये सन २०१९ ते २०२३ दरम्यान गरीब, गरजू शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी, या धोरणाने अनुदानित शेडनेट, पॉली हाऊस उभारणी योजना राबविण्यात आली होती. परंतु शेडनेट, पॉली हाऊस उभारणीत कंपनी / ठेकेदार यांनी काही दलालांना हाताशी धरून अनेक ठिकाणी फक्त कागदोपत्री शेडनेट, पॉलीहाऊस उभारणी केल्याचे आढळून आले. या योजने अंतर्गत दरपत्रक प्रपोजल प्रमाणे साहित्य असल्याची वस्तुस्थिती आढळून आली नसल्याने यात कृषी अधिकारी भ्रष्टाचार करण्यात लिप्त आहेत. तसेच ठेकेदारांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आमिष देवून उभारलेले शेडनेट, पॉली हाऊस ३ महिन्यात अथवा १-२ वर्षात काढून घेतले. यामुळे शेतकऱ्यांवर बँकेचा बोजा वाढला. शेतकऱ्यांवर सदर अवास्तव कर्ज लादणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व कमी क्षेत्रा वर कर्ज देणाऱ्या बँका व बँकेतील अधिकारी हे जबाबदार आहेत. ट्रेनिंगचे नावाखाली बनावट कागदपत्र जोडल्याने शेतकरी प्रशिक्षण पासून वंचित राहिल्याने फसगत झाली. शेतकऱ्यांच्या खात्यातून मंजूर कर्ज, शासकीय अनुदान संमतीपत्र किंवा ना हरकत दाखला न घेता संबंधित कंपनी, ठेकेदार, दलाल यांनी कृषी खात्यातील व काही अशासकीय मंडळी यांच्याशी संगनमत करुन सदरचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर काढून घेतला असल्याचाही आरोप आहे. सदर घोटाळ्याची कसून चौकशी होऊन संबधित भ्रष्ट लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत व सन २०१८ -१९ मध्ये सध्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी शेडनेट न उभारता अनुदान लाटल्याने त्यांच्या सह कृषी अधिकारी यांच्या वर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी प्रजासत्ताक दिनी सचिन बाळू पाटील, अनंत निकम व कैलास दगा पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी तहसील कार्यालया समोर स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले. आंदोलन स्थळी तहसीलदार सुराणा व कृषी अधिकारी ठाकरे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकर्त्यांना पंधरा दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
