उद्या दि.१ फेब्रुवारी रोजी अमळनेरात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला बालसाहित्य संमेलन

संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष बालकच

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला उद्या दि. १ फेबुवारी रोजी बालसाहित्य संमेलन होणार आहे. या बालसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, उद्घाटक ही सर्व मंडळी विविध शाळांमधील बालकच आहेत. प्रताप महाविद्यालयातील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेल्या ‌‘साने गुरुजी साहित्य नगरी’त हे बालसंमेलन होईल.

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर शहरात होत आहे. यानिमित्ताने दि. १ फेब्रुवारी रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगावचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख याची निवड करण्यात आली आहे. बाल उद्घाटक म्हणून रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थिनी पियुषा गिरीष जाधव तर बाल स्वागताध्यक्षा म्हणून डी.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थिनी दीक्षा राजरत्न सरदार हिची निवड झाली आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १ रोजी बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समूहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदी कलाविष्कार सादर करणार आहेत. या कलानंद बालमेळाव्यासाठी बाल अध्यक्ष, बाल उद्घाटक व बाल संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी अमळनेरातील प्रताप तत्त्वज्ञान मंदिरात नुकतीच कार्यशाळा पार पडली होती. यावेळी शुभम देशमुख, पियुषा जाधव, दीक्षा सरदार यांची नावे जाहीर करण्यात आली.

विद्यार्थीच सांभाळणार सर्व कामांच्या जबाबदाऱ्या…
बालमेळाव्यात सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थीच सांभाळणार आहेत. त्या जबाबदाऱ्यांचे वाटप या कार्यशाळेत करण्यात आले. यात सूत्रसंचालन : भाविका वाल्हे, निधी पवार, समृध्दीराजे पाटील, आकांक्षा पाटील, नेहा पाटील, प्रास्ताविक : डॅफोडील सोनवणे, मृणाल पवार, अजिंक्य सोनवणे, रिचल पाटील, अतिथी परिचय : जिगाशा महाजन, हिमांशू राजपूत, मृणाल पाटील, देवयानी साळुंखे, आभार प्रदर्शन : जिज्ञासा पाटील, कृष्णा पवार, मनस्वी पाटील, नेहा पाटील, सुमित पाटील तसेच अश्विनी पाटील, मानव पाटील, लोकेश पाटील, संजना नेरकर, तनय पाटील, कृतिका साळुंखे यांच्याकडे व्यासपीठ व्यवस्थापन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आज दिवसभराचे कार्यक्रम…
दिनांक १ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते २ या वेळात कथाकथन सत्र होईल. विलास सिंदगीकर अध्यक्षस्थानी असतील. दुपारी २ ते ३ या वेळेत काव्यवाचन सत्र होईल. ज्येष्ठ बालसाहित्यिक आबा महाजन अध्यक्षस्थानी असतील. दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत बालनाट्य सत्र होईल. ज्येष्ठ साहित्यिक माया धुप्पड अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी ४.३० ते ५.३० दरम्यान नाट्यसत्राचा समारोप होईल. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पारखी असतील. याआधी ४ वाजता ‌‘साहित्याच्या वारी… रसिकांच्या दारी’ हा कार्यक्रम होईल.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!