दोन दिवसीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन
अमळनेर : येथील विद्रोहीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला २ फेब्रुवारी रोजी परिवर्तन संस्था जळगाव निर्मित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित श्रीकांत देशमुख लिखित नाट्य रूपांतर ”नली ” या एकल नाट्य प्रयोगाने जणू विद्रोही विचारांच्या पेरणीचे बीज उभरले. विद्रोही च्या मंचावर आज ‘नली’ चा ८७ वा प्रयोग झाला. कलावंत हर्षल पाटील यांनी प्रमुख भूमिका केली. यावेळी स्व इच्छेनुसार दर्दी रसिकांची तोबा गर्दी होती. विशेषतः महिला, युवतींची संख्या लक्षणीय होती. श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद पाहता विद्रोही साहित्य संमेलन एतिहासिक व यशस्वी होईल असेच चित्र आहे. अमळनेरकर व साहित्य नगरीत येणारे रसिक श्रोत्कायांनी कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक केले. प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी प्रास्ताविक केले.
‘नली’ या नाट्यप्रयोगात अबोध मनातील प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या समोर येत असतांना गावखेड्यातल्या महिलांचं जगणं, ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, जातीव्यवस्थेतील महिलांचं स्थान, गावगाड्यातील सामाजिक संरचना तसेच खेड्यातली कुटुंबव्यवस्था, शिक्षण, वृक्षतोड आणि शेती संस्कृतीतील अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मूळ लेखक श्रीकांत देशमुख लिखित नाट्य रूपांतर शंभू पाटील यांनी केले आहे. दिग्दर्शक योगेश पाटील, पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना अक्षय नेहे, वेशभूषा मंजुषा भिडे यांची तर कविता वाचक स्वर नयना पाटकर यांचा असेल.तर निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर हे आहेत. या नाट्यप्रयोगाचे कलाकार हर्षल पाटील व सह कलाकार यांचा चंद्रकांत वानखेडे, श्याम पाटील, प्रा. अशोक पवार, प्रशांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. निमंत्रक रणजित शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागरिकांनी दोन दिवसीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे.