महात्मा फुले हायस्कूल, देवगाव देवळी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

विद्यार्थी हेच शिक्षकाच्या कार्याची पोचपावती असल्याने गुणवत्तेशी तडजोड करू नका : विलासराव पाटील

अमळनेर : चांगली शाळा ही गावाचा आरसा असते. शाळेत शिक्षक चांगले असतील तर विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होतो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले करिअर घडवतांना समाधान मिळत आहे. महात्मा फुले यांच्या नावाने शैक्षणिक संस्था सुरु होऊन आज तिचे वटवृक्षात रूपांतर झाले. विद्यार्थी हेच शिक्षकाच्या कार्याची पोचपावती असतात त्यामुळे गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच की, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो असे मत देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे चेअरमन व संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी व्यक्त केले. म. फुले हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नवल पाटील, संस्थेचे जेष्ठ संचालक धर्मराज पाटील, झावरु पाटील, राजाराम बैसाणे, एन.जी.देशमुख, सुरेश पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन होते. सुरुवातीला उपस्थितांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी वर्षभरातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी जयश्री पाटील, श्वेता बैसाणे, भाग्यश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे ज्येष्ठ संचालक धर्मराज पाटील म्हणाले की, संघर्षाला कधीही दुर्दैव मानून पळ काढू नये. संघर्षास सामोरं जाणा-याला यश हमखास मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हा मुद्दा नसतो तर बेतलेल्या प्रसंगाचा आपण कसा सामना करतो, हे महत्त्वाचं असतं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. एस. एल. पाटील यांनी ग्रामीण भागात शाळा सुरु करुन अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करत असल्याचा अभिमान आहे. शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता जोपासली आहे. त्यामुळे निकाल चांगला मिळत आहे. संस्थेचे उपाध्यक्ष नवल दादा पाटील म्हणाले की, गुणवत्तेशी तडजोड करू नका.. प्रयत्न करत रहा यश तुमचेच आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना उपस्थितांनी शुभेच्छा देत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

मागील वर्षी दहावी प्रथम आलेली विद्यार्थिनी भाग्यश्री महेंद्र पाटील हिला मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देण्यात आले. विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण व यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय हिंदी परीक्षेत १००% निकाल लागल्यामुळे परीक्षेचे मार्गदर्शक मुख्याध्यापक अनिल महाजन व शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा हिंदी परीक्षा प्रमुख ईश्वर महाजन यांचा सन्मानपत्र व मेडल देऊन मान्यवरांनी सन्मान केला. वर्गशिक्षक अरविंद सोनटक्के यांना दहावीच्या विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला. शेवटी दहावीच्या विद्यार्थ्यांनी फोटो सेशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. के. महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!