‘राम’ आमचं पुर्वापार वैभव; राम राम म्हणण्यातच खरा राम. तर मग ‘जय श्रीराम’ राजकीय नारा कशासाठी ? : विश्वंभर चौधरी
सन २०२४ च्या निवडणुकीत शेतकरी, महिला व दलित वर्ग सत्ता परिवर्तन करणार !
अमळनेर : राजनिती साठी हर घर तिरंगा, जय श्रीराम, वंदे मातरम् चा वापर करुन जनतेच्या भावनांशी खेळ सुरु आहे. आता ‘हिंदू खतरे में..’ म्हणण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेसच्या काळात देखील तिरंगा होता, राष्ट्रगीत, वंदेमातरम म्हटले जात होते. ‘राम’ तर आमचं पुर्वापार वैभव असल्याने राम मंदिराला विरोध नाही पण रामाच्या नावाने स्वार्थी राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती ला आमचा विरोध आहे. समोरच्या व्यक्तीला राम राम म्हणण्यातच आमचा खरा राम आहे. यांचा आहे तो नथूराम. तर मग ‘जय श्रीराम’ चा राजकीय नारा कशासाठी ? असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केला. अमळनेर येथील धुळे रोडवर सानेगुरुजी विद्यालयाचे प्रांगणात काल सायंकाळी झालेल्या ‘निर्भय बनो’ जाहीर सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे, पत्रकार निखिल वागळे यांनी ‘निर्भय बनो’ अभियान चालविले आहे. त्याचा भाग म्हणून ही जाहीर सभा पार पडली. विचार मंचावर वक्ते ॲड. असीम सरोदे, वासंती ताई दिघे, प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, श्याम पाटील, रियाज मौलाना, प्रा. डॉ. लिलाधर पाटील उपस्थित होते.
श्री विश्वंभर चौधरी पुढे म्हणाले की, समाज व्यवस्था बदलण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांचे मोठं योगदान आहे. आजपर्यंत पंतप्रधान मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही पण माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी १४३ पत्रकार परिषद घेतल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने किती खरी ठरली ? मोदी पंतप्रधान असताना उद्योजकांची मोठी कर्ज माफ केली मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांना कमी बाजारभाव, आत्महत्या, महागाई, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, देशातली गरीबी असे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. हिंदुत्वाच्या आड त्यांना सर्व काही लपवायचे आहे. पंतप्रधानांची बनावट पदवी असताना स्वतःला विश्व गुरु समजून वावरत आहेत. जळगाव जिल्ह्यातील संकटमोचक एक नंबरचा भित्रा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. ज्या नेत्यांवर ईडी लावली तेच आज भाजपात आहेत. यातून ईडीचा बेशरमपणा अधिकच स्पष्ट आहे. भाजपाला विरोधी पक्ष शत्रू वाटतो. आधी तसं नव्हतं विरोधी पक्षाला व्यक्ती स्वातंत्र्य होतं. ज्ञानोबाराय यांनी देखील हे विश्वची माझे घर.. म्हटले आहे. आता तर जिथे तिथे मोदींचा फोटो दिसतो. देशाचे पंतप्रधान मोदी संविधानिक जबाबदारी विसरून काम करत आहेत. एका नराधम सामूहिक बलात्काऱ्याला पावन करून त्यांनी शोभा करवून घेतली आहे. यातून नुसत्याच दिखाऊ गप्पा करणाऱ्या भाजप पक्ष आणि नेत्यांचे खरे रुप समोर आले आहे. भारतातील चाटू मीडियाने जे दाबून टाकले, ते सातासमुद्रापार माध्यमांनी टिपले. पदाची व देशाची प्रतिष्ठा कलंकित केली. देशाची अब्रू घालवणारा पंतप्रधान या देशाने गेल्या सत्तर वर्षांत पाहिला नाही. देशाचा इतिहास बदलविण्याचे व संविधानाची मोडतोड करण्याचे काम केले जात आहे या गोष्टींचा विचार करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सन २०१४ च्या निवडणुकीत मोदींनी देशातील जनतेला अच्छे दिन चे स्वप्न दाखविले. जनतेनेही विश्वास ठेवून भाजपला एकहाती संधी दिली. मात्र जनतेचं स्वप्न भंगले. राजकारणातले मुरब्बी नेते शरद पवार यांनी भाजपची चाल ओळखून चाणाक्ष बुद्धीने २०१९ ला महाराष्ट्रात महाविकास आघाडी च्या माध्यमातून सत्ता खेचून आणली. येथूनच खरे राजकीय षडयंत्र सुरु झाले. मात्र सन २०२४ च्या निवडणुकीत शेतकरी, महिला व दलित वर्ग सत्ता परिवर्तन करणार हे निश्चित आहे. सध्या मोदी, शहा यांची हुकूमशाही मोडीत काढून भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.
ॲड. असीम सरोदे म्हणाले की, घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी सध्याच्या राजकारणात होत आहेत. ईडीची भिती, दडपशाही ने कहर केला आहे. भ्रष्टाचार असेल तर ईडी चा वापर होतो, विचार मांडण्यासाठी नव्हे. लोकशाही चा खून होत असूनसुद्धा न्याय व्यवस्थेवर कोणी बोलायला तयार नाही. सर्वच न्यायाधीश वाईट नसतात. काही पाळीव न्यायाधीश तर काही विकले गेलेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र चे राजकारण नासवले असून अत्यंत विकृत चेहरा आहे. दोन पक्ष फोडणं महान कार्य समजून सभेत सांगितले जाते. यात असली कोण व नकली कोण? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. सन २०२४ च्या निवडणूकी पूर्वीच सुरत येथील भाजपचा उमेदवार दलाल या व्यक्ती ची निवड जाहीर करणं हे कितपत योग्य आहे ? तो न्याय प्रक्रियेचा भाग आहे. नोटा मत कशासाठी..? मतदार तो उमेदवार नोटा मत टाकून नाकारु शकतात तो मतदारांचा हक्क आहे. त्यावरही मतदान व्हायला हवे. तडीपारीचा अनुभव असलेला गृहमंत्री लाभतो यातून आपली लायकी समजते. पण आता सत्ता परिवर्तनासाठी जनता एकवटली आहे. महायुती देशात २०० पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही. संविधानाने बोलण्याचा व विचार मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार दिला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे काम केले. राजकीय सूडचक्राने संविधानाची मोडतोड करण्याचे काम सुरु आहे. राज्यपालांकडून थोरांबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर होतो. अजितदादाला चिन्ह दिले पण साहेबांनी सेलच काढून घेतला. पक्ष हिसकावून घेतले… एक फुल दोन हाफ चं सरकार आहे. मोदी दुतोंडी साप. मॅनेजर नव्हे लीडर निवडून द्या. ३७० कलमला विरोध नाही पण स्वतः अधिकारात मंजूरी. महान नेत्यांचं अपहरण हा त्यांचा धंदा. वाईट प्रवृत्तीचे लोक सर्वच ठिकाणी असतात. ती प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. लोकशाही चं शम्य बाळगत आता मतदारांनाच लाज वाटायला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींना झोपण्यासाठी सुट्टी द्यावी. गांधीजींचा नथूराम गोडसे नतमस्तक होऊन खून केला तेच मोदी करताहेत. गरिबांचा राग, दिखाऊ स्वच्छतावादी, धर्मांधतेचा हैदोस, मिडीयाला ताब्यात घेतले. केरळ स्टोरी तून.. हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवले. संविधान बदलणे ही वेगळी प्रक्रिया आहे. व्यक्तींना नव्हे तर प्रवृत्ती ला विरोध आहे. UPSC / MPSC पेपर फूटीवर ते बोलत नाही. आदित्य ठाकरे, राहुल गांधी हे बोलताहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. लिलाधर पाटील यांनी केले. आभार दयाराम पाटील यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी सचिन बाळू पाटील, अनंत निकम, संदीप घोरपडे, डी.ए.पाटील यांचेसह विद्रोही चे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.