स्वच्छ भारत सर्व्हेक्षण अभियानात उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या अमळनेर नगरपालिका यंत्रणेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

जादा कर भरणाऱ्या प्रताप शेठ नगर या उच्चभ्रू वस्तीत कचऱ्याचे ढीग; सार्वजनिक जागी नेहमीच अस्वच्छता


अमळनेर : स्वच्छता असेल तेथे लक्ष्मीचे वास्तव्य असतेच. अस्वच्छता किंवा कचऱ्याचे साम्राज्य असते तिथे रोगराई यायला वेळ लागत नाही. दुर्दैवाने अशीच काहीशी परिस्थिती अमळनेर शहरातील प्रतापनगर परिसराबाबत झाली आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. स्वच्छ भारत सर्व्हेक्षण अभियानात उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारी अमळनेेर नगरपालिका कुठे लुप्त झाली कळत नाही. अमळनेर सांस्कृतिक, कला नगरी, उद्योग नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मात्र.. अलीकडच्या काळात कचरा समस्येने शहराच्या या स्वच्छ आणि लोभस प्रतिमेला एक प्रकारे गालबोट लागत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

शहरातील जादा कर भरणाऱ्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रतापनगर परिसरात हनुमान मंदिर व दुर्गादेवी मंदिरा शेजारी पश्चिमेला असलेल्या मोकळ्या जागेत बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून कचऱ्याचा ढीग लागला आहे. हाच कचरा हवेने वारा वादळात अस्ताव्यस्त पसरत आहे. शेजारीच पत्रा लाऊन मुतारी तयार केली आहे. बरेच जण मुतारी चे बाहेरच उभे राहून लघवी करताना दिसतात. जवळच मंदिरे व रहिवासी असल्याने महिलांना ते पाहून डोळे मिटून सहन करावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील प्रमुख पेट्रोल पंप ला लागून असलेल्या सार्वजनिक जागी तीनही बाजूंनी भिंती जवळ कचरा, झाडेझुडपे असतात, रस्त्यांची कधीच सफाई होत नाही. सफाई कामगार फिरकत नाहीत. पेट्रोल पंप वर काम करणारी मंडळी उरलेले अन्न भिंतीवर अथवा भिंती बाहेर टाकून देतात. तेथे कोणी अनावधानाने पेटलेली विडी, सिगारेट फेकली तर मोठा अनर्थ घडू शकतो. प्रमुख पेट्रोल पंपाचे संचालक बघून न बघ्याची भूमिका घेतात. नगरपालिकेने परवानगी देताना कोणत्या अटीवर दिली हा मोठा प्रश्न आहे. आजूबाजूला असलेल्या रहिवाशांना यामुळे नियमित त्रास होतो. स्वच्छ सर्व्हेक्षणात नाव कमावणाऱ्या अमळनेर नगरपालिका यंत्रणेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असून तक्रार करुनही याबाबत कोणी बोलायला तयार नाही. कुठेही उघड्यावर कचरा टाकून घाण करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करायला हवी.. मात्र तसे होत नाही.

शहराने स्वच्छ भारत सर्व्हेक्षण अभियानात स्वच्छ आणि सुंदर शहराचा मानाचा किताब पटकावला होता. तेव्हा प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली होती. आता मात्र या सर्वांवर पाणी फिरले गेले की काय, किंबहुना नगरपालिकेच्या हे विस्मृतीत गेले आहे की काय, अशी सद्य परिस्थिती आहे. याला शहर आणि परिसरातील बेजवाबदार नागरिकांबरोबर नगरपालिकेची अकार्यक्षम यंत्रणा जबाबदार आहे. परिसरात, गल्लीबोळात नागरिक कुठेही कचरा उघड्यावर टाकतात. मग या कचऱ्याचा वेळोवेळी उठाव करणे ही पालिकेची जबाबदारी नाही का ? हा प्रश्न आहे. शहर आणि परिसरात ‘जागा मोकळी दिसली की.. टाक कचरा’ अश्या पद्धतीने उघड्यावर कचरा टाकण्याची स्पर्धा निर्माण होईल आणि यातून भविष्यात रोगराई देखील पसरण्याचा धोका आहे. पालिकेवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी सह नगरपालिकेने सामाजिक संस्थांची ही मदत घ्यावी. प्रसंगी उघड्यावर कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर नगरपालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. शहरालगत मंगळग्रह मंदिर असून आपल्या शहराची प्रतिमा डागाळू नये असा प्रामाणिक प्रयत्न असायला हवा. पेट्रोल पंप च्या परिसरात अघटीत घटना घडल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार असणार आहे हे लक्षात घेऊन संबंधितांना सूचना द्यायला हव्यात. पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!