श्री दत्तगुरु इंग्लिश मीडियम स्कूल व श्री मुरलीधर कत्थू पाटील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, जवखेडे विरुद्ध गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
अमळनेर : तालुक्यातील जवखेडे येथील शिक्षण संस्थेत जादा अनुदान लाटल्या प्रकरणी संस्थाचालक व गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद बोलावून एकमेकांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. तथापि.. न्यायालयीन बाब म्हणून दाद मागितली जाईल असे दोन्हीही बाजूने सांगण्यात आले आहे.
शासनाची दिशाभूल करुन संस्थाचालकांनी बोगस विद्यार्थी दाखवून एकूण प्रतिपूर्तीची रक्कम ८७,२३,९०४ ज्यादा अनुदान लाटले : गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मध्ये कलम १२ (२) नुसार आरटीई २५ टक्के विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती शासनाने प्रतिवर्षी निश्चित केलेले दर व शाळांनी त्या त्या वर्षी ठरवलेली फी यापैकी जे कमी असेल त्यानुसार संबंधित शाळांना देयक अदा करण्यात येते. अमळनेर तालुक्यातील अभिनव युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जवखेडे संचलित श्री दत्तगुरु इंग्लिश मीडियम स्कूल व श्री मुरलीधर कत्थू पाटील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आहेत. या दोनही शाळांची आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा निहाय प्रतिपूर्ती साठी दाखल केलेल्या शैक्षणिक शुल्काच्या तपशीलात तफावत आढळून आल्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी सांगितले. श्री भटू मुरलीधर पाटील संस्था सचिव असून त्यांचा भाऊ योगेश मुरलीधर पाटील संस्था अध्यक्ष आहेत. योगेश पाटील व्यवसायाने स्वतः वकील असल्याने भ्रष्टाचारा संदर्भात कोणी वाच्यता करू नये म्हणून सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून पोलिसांत खोटे गुन्हे दाखल करून जीवे मारण्याच्या धमक्या देत असतात तसेच खोटे व्यक्ती उभे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदनामीकारक वृत्त/ बातम्या प्रसिद्ध करत असतात असा आरोप केला.
श्री दत्तगुरु इंग्लिश मिडियम स्कूल, जवखेडे या शाळेने आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा संस्था स्थापन वर्षांपासून सन २०१२ -१३ ते २०२३ -२४ पर्यंत प्रतिपूर्ती साठी दाखल केलेल्या शैक्षणिक शुल्काचा तपशीलात एकूण १२९९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रतिपूर्तीसाठी देयके सादर केली आहेत. प्रत्यक्षात शासन निर्णय परिपत्रक पूरक पत्रकान्वये सरल पोर्टल नुसार एकूण दाखल विद्यार्थ्यांच्या आरटीई २५% पात्र विद्यार्थ्यांची संख्या ५१८ असताना संस्थेने शासनाकडून १३७,२१,९७० अनुदान प्राप्त करून घेतलेले आहे. संबंधित संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शासनाची व प्रशासनातील अधिकाऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करून देयके सादर करताना ७८,७५,७४४ रुपये जादाचे अनुदान लाटल्याचे प्रथमदर्शनी सरल पोर्टल वरील दाखल विद्यार्थी संख्ये नुसार निदर्शनास आल्याचे सांगितले. याचप्रमाणे.. श्री मुरलीधर कत्थू पाटील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, जवखेडे या शाळेने इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गातील विद्यार्थ्यांचे आरटीई २५% प्रतिपूर्तीसाठी संस्था स्थापन वर्ष सन २०१७ -१८ ते २०२३ -२४ पर्यंत देयके सादर करताना प्रत्यक्षात १२१ विद्यार्थी संख्या असताना २७६ विद्यार्थ्यांचे देयक सादर करुन १५५ विद्यार्थ्यांचे जास्तीची प्रतिपूर्ती दाखल करून ८,४८,१६० रुपये जादा अनुदान लाटल्याचे प्रथमदर्शनी सरल पोर्टल वरील दाखल विद्यार्थी संख्ये नुसार निदर्शनास आले आहे. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत दाखल विद्यार्थ्यांचे ७८,७५,७४४ व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे ८,४८,१६० असे एकूण प्रतिपूर्तीची रक्कम ८७,२३,९०४ शासनाकडून ज्यादा चे अनुदान लाटून फसवणूक केलेली असल्याने या संस्थेच्या दोन्ही शाळांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी आढळणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्याकडून शासनाची फसवणूक करून ज्यादा लाटलेले अनुदान वसूल होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा व सदर शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत कळविण्यात आले असून अधिकारी व शासनाने लक्ष घालून कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी पदाचा दुरुपयोग करीत असून शाळेकडून अनुदानावर ५ टक्के टक्केवारी मागितली : ॲड. योगेश पाटील
दत्तगुरु इंग्लिश स्कूल, जवखेडा संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील व सचिव भटू पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, अमळनेर येथील गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचा राग येऊन त्यांनी स्वतःच्या बचावासाठी कोणत्याही स्वरूपाचा कायदेशीर आधार नसताना, शाळेबाबत कोणतीही तक्रार अथवा चौकशी झालेली नसताना शाळेला आरटीई कायद्यानुसार मिळालेल्या हक्काचे अनुदान याबाबत रावसाहेब पाटील यांनी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन श्री दत्तगुरु इंग्लिश स्कूल सह संस्थाचालक यांची बदनामी केली. त्यांनी जाहीर केलेले आकडे कोठून मिळवले आम्हाला माहीत नाही. खरे ते बाहेर येईलच. विद्यार्थी प्रवेशाचे व्हेरिफिकेशन केले जाते त्यानंतर अनुदानाची मागणी होत असते. गटशिक्षणाधिकारी यांनी अधिकाराने चौकशी केली असती तर आम्ही उत्तर दिलेच असते. त्यांच्या उदात्त हेतूचे वेळोवेळी स्वागत केले आहे.. पण जे चूक आहे त्याला माफी नाही. कायद्याचा धाक सर्वांसाठी असावा. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. आम्ही दोषी ठरलो तर सर्व पैसे परत देऊ. संस्थेच्या बदनामीमुळे त्यांच्यावर मानहानी, अब्रू नुकसानीचा फौजदारी गुन्हा तसेच आर्थिक नुकसानीचाही गुन्हा दाखल करणार आहोत. रावसाहेब पाटील हे जबाबदार गटशिक्षणाधिकारी असून त्यांना मिळालेल्या पदाचा ते स्वतःच्या स्वार्थासाठी दुरुपयोग करीत आहेत. आरटीई कायद्यानुसार २०१३ पासून प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन होते तसेच तालुका व जिल्हास्तरावरून सदर विद्यार्थी निवडले जातात. प्रवेश प्रक्रियेत शाळेचा काहीही संबंध नसतो. शासनाने पात्र केलेले विद्यार्थी शाळेत दाखल करावे लागतात. आमची शाळा स्वयं अर्थसहाय्यक असल्याने शाळेला कोणत्याही प्रकारचे अनुदान शासन देत नाही. परंतु आरटीई कायद्यानुसार विद्यार्थी २५% फी ची प्रतिपूर्ती मिळणे हा शाळेचा हक्क आहे आणि ती हक्काची रक्कम शाळेला गेल्या १२-१३ वर्षात मिळाली. त्याच्यावर रावसाहेब पाटील यांनी धमकी देऊन शाळेकडून पाच टक्के टक्केवारी मागितली. सदर टक्केवारी शाळेने न देता पाटील यांच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांना त्याचा राग येऊन शाळेबाबत बदनामी करणाऱ्या प्रतिक्रिया रावसाहेब पाटील देत आहेत. त्यांनी केलेले आरोप हे खर्चापोटी असून या प्रकाराची एसआयटी चौकशी व्हावी व तोपर्यंत रावसाहेब पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.