भुसावळ : ‘शालांत परिक्षेच्या यशाला यशोशिखर मानू नका ते यश तात्कालिक असून उद्याच्या भविष्यकालीन उतुंग शैक्षणिक यशाची पहिली पायरी आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे’ असे मार्मिक प्रतिपादन साहित्यिक विजयराव रूम यांनी केले. सत्यशोधक समाज संघातर्फे सन २०२३ -२४ वर्षात माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रज्ञावंत सुकन्यांचे कौटुंबिक वातावरणात सत्कार करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक विजयराव रूम ( सेवानिवृत्त अभियंता, महावितरण ) यांच्या हस्ते दि. ४ जून २०२४ रोजी समृद्धीला शाल व वाचनीय ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रज्ञावंत समृद्धी विष्णू वानखेडे हिने ९६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त करत ओरियन सी.बी.एस.सी.इंग्लिश मिडियम स्कूलमधून द्वितीय क्रमांक पटकावला. एवढेच नव्हे तर सिल्व्हर पदकाची मानकरी होत गुणवत्तेचा अमिट इतिहास शाळेत लिहिला. समृद्धीला पेंटिंग या विषयात विशेष रुची आहे तसेच अवांतर वाचनाचाही छंद आहे. पिताश्री विष्णू रामचंद्र वानखेडे सेंट्रल रेल्वेत ( भुसावळ ) लोको पायलट असून मातोश्री जयश्री वानखेडे जळगाव सिव्हील हॉस्पिटल मध्ये सिनियर परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. वानखेडेंचे परमस्नेही महेश शिंपी (सचिव, अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव ) यांनीही समृद्धीचा यथोचित सत्कार केला. याप्रसंगी मातोश्री जयश्री वानखेडे,आजी रत्नाबाई गाढे, विजय लुल्हे उपस्थित होते.