वृक्ष हेच ऑक्सिजन-प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत
अमळनेर : येथील साई इंग्लिश अकॅडमी तसेच सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण, अमळनेर चे वनपरिक्षेत्र अधिकारी बळवंत विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन वन विभाग टीमची उपस्थिती लाभली. सामाजिक वनीकरण, अमळनेरचे वनपाल आय. टी. चव्हाण, पी.जे.सोनवणे, वैशाली साळी तसेच वनरक्षक सीमा शिंदे, सुप्रिया देवरे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी आय.टी. चव्हाण व सीमा शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जगभरात पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या जाणवत आहेत. त्यासंदर्भात जनमानसांत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्व आपल्याला समजले. वृक्ष हेच ऑक्सिजन-प्राणवायूचे प्रमुख स्त्रोत आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त वृक्ष लावून, ती जगवली पाहिजेत. या प्रसंगी साई इंग्लिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली. आम्हाला मिळालेली रोपे आम्ही आजच आमच्या घराच्या बागेत, परिसरात, शेतात व इतरत्र लावू. रोपांची काळजी घेऊन, संगोपन करुन रोपांचा वाढदिवस साजरा करु. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रास्ताविक साई इंग्लिश अकॅडमी चे संचालक भैय्यासाहेब मगर
यांनी केले. सूत्रसंचालन व आभार कु.प्रियंका बारी यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.