छत्रपती शाहू महाराज यांचे विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी व्याख्यान कार्यक्रम संपन्न

युवा कल्याण प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम : एकाच वेळी ९० ठिकाणी व्याख्याने

अमळनेर : महिलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा व वस्तीगृह उभारले, देवदासी प्रथेवर बंदी घातली, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, स्वतःच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना परदेशात पाठवले, औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले, मागासवर्गीयांना नोकरीत ५० टक्के आरक्षण लागू केले, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले, अस्पृश्य व मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन दिली, स्वातंत्र्य -समता -बंधुता -सामाजिक न्याय या मूल्यांची अंमलबजावणी केली अशा छत्रपती शाहू महाराजांना नुकतेच १५१ व्या जयंती निमित्त अनेक ठिकाणी विनम्र अभिवादन करुन त्यांचे विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व्याख्यान कार्यक्रम राबविण्यात आले. अमळनेर शहर व तालुक्यात ९० ठिकाणी व्याख्यानाचे कार्यक्रम झाले. सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्व, कर्तुत्व व नेतृत्वाविषयी माहिती पोहोचली. शासकीय आर्थिक मदतीशिवाय हा उपक्रम राबविला जात आहे. हा प्रबोधन पर व महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याचे युवा कल्याण प्रतिष्ठानचे चौथे वर्षे होते. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानात सहभागी होऊन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा असे आवाहन करत युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी माहिती दिली.

छत्रपती शाहू महाराजांविषयी व्याख्याने देण्यासाठी धनदाई संस्थेचे चेअरमन नानासाहेब डी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जून २०२५ रोजी वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा. डॉ. राहुल निकम यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्रा. डॉ. लिलाधर पाटील, संदीप घोरपडे, अनिता बोरसे, वैशाली शेवाळे, डी. एम. पाटील, बापूराव ठाकरे, डी. ए. पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, गौतम मोरे, चिंधु वानखेडे आदी वक्ते उपस्थित होते. यावेळी सोपान भवरे यांनी तयार केलेले शाहू महाराजांवरील वाचन साहित्य सर्वांना देण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या हा वारसा पुढे चालवण्यासाठी सामाजिक न्यायाचा जागर करण्याचा निर्धार युवा कल्याण प्रतिष्ठानच्या सर्व वक्त्यांनी केला.

युवा कल्याण प्रतिष्ठानच्या या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमात वक्ते म्हणून प्राथमिक / माध्यमिक शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, महिला, ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त शिक्षक- अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, युवक आदींचा समावेश असतो. कोणीही वक्ता मानधन व प्रवास खर्च घेत नाही. सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातो. शाहू महाराजांच्या कर्तृत्वाविषयी सुमारे ३५० विद्यार्थी वक्त्यांनी आपल्या शाळांमध्ये भाषणे केली. शिवश्री बापूराव ठाकरे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिलेले पुस्तक विद्यार्थी वक्त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!