शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन तर शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी सजावट साहित्याची बॅग बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत घरपोच देणार

अमळनेर : येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. फटाक्यांची आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात आ.अनिल पाटील व सौ.जयश्री पाटील यांची सजविलेल्या बग्गीवरून सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली होती. प्रचंड संख्येने शेतकरी व चाहते उपस्थित होते. यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार अनिल पाटील यांची शैक्षणिक साहित्य तुला करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद यांनी आ.अनिल पाटील यांचा सत्कार केला. समारंभात अमळनेेर तालुक्यातील ३००० बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा सण साजरा करता यावा यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात बैल साज देऊन, तर मापाडींना लॉकर किल्लीचे वाटप आमदार.अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, सौ. जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवनिर्वाचित विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

आमदार अनिल पाटील म्हणाले की, मतदारसंघ बागायत होत नाही तोपर्यंत मी शेतकऱ्याची साथ सोडणार नाही. येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद आमच्या ताब्यात द्या. शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना पोहचवून विकास करुन दाखवू . शेतकऱ्यांनी पोळा सण पारंपरिक पद्धतीने जरुर साजरा करावा पण शेतकरी आधुनिकतेकडे जावा, कृषी साक्षर व्हावा. यादृष्टीने येणाऱ्या काळात बाजार समितीने कार्यक्रम राबवावेत असेही आवाहन सत्काराला उत्तर देताना त्यांनी केले.
कष्टकरी मापाडींना स्वतंत्र लॉकर सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील पहिली बाजार समिती…
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो मापाडी काम करतात. अशा कामगारांसाठी आपले साहित्य, डबा व महत्वपूर्ण वस्तू ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देण्यात आले असून मापाडी यांना वैयक्तिक लॉकरच्या किल्ल्यांचे वाटप खा. स्मिता वाघ, मा. जि. प. सदस्या सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, शैक्षणिक साहित्याचे वाटप तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन करण्यात येईल तर बैलजोडीसाठी आवश्यक विविध वस्तू, सजावट साहित्याची बॅग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत ३००० शेतकऱ्यांपर्यंत घरपोच पोहोचविण्यात येईल. आमदार अनिल पाटील बाजार समितीसाठी नेहमीच लकी ठरलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती कर्जमुक्त होऊन ५ कोटी शिलकी आहे. विविध विकास कामे करीत असताना बाजार समिती यंदा जिल्ह्यात क्रमांक १ व विभागात क्रमांक ३ झाली आहे. शेतकरी निवास मंजूर झाले असून शेतकऱ्यांना स्वस्त चविष्ट भोजन लवकरच उपलब्ध करून देऊ. एकमताने काम करणाऱ्या सर्व संचालकांसोबत काम करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत आ.अनिल पाटील यांनी पुन्हा मंत्री व्हावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अनिल शिंदे, डॉ. अशोक पाटील, भोजमल पाटील, समाधान धनगर, हिरालाल पाटील, प्रफुल्ल पाटील, सौ. सुषमा पाटील, सौ. पुष्पा पाटील, भाईदास भिल, नितीन पाटील, प्रकाश वाणी, ऋषभ पारख, शरद पाटील, माजी जिल्हा बँक संचालिका सौ. तिलोत्तमा पाटील, सौ. रिता बाविस्कर, माजी संचालक अनिल शिसोदे, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भागवत पाटील, मुख्तार खाटिक, जळगाव जिल्हा गटसचिव पतसंस्थेचे चेअरमन विजय पाटील, शिवाजीराव पाटील, प्रा. सुरेश पाटील, डॉ. रामराव पाटील, गणेश भामरे, शितल देशमुख, हेमंत पवार, प्रसन्ना जैन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. आभार उपसभापती सुरेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. उमेश राठोड यांच्यासह कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.