परिसरातील नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

अमळनेर : येथील समस्त ढेकू रोड वासियांच्या वतीने अमळनेर उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ढेकु रोड ( प्र. जि. मा. -५१ ) या मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण काम सुरु करणेबाबत गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी स्मरणपत्र देण्यात आले. राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील यांच्या नेतृत्वात ढेकू रोड परिसरातील नागरिकांनी एक्स -रे, ऑटो गॅरेजची बिले व स्मरणपत्र देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यापूर्वी दिनांक १५ मे २०२५ रोजी देखील सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील यांच्यासह काही नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष भेट घेत ढेकू रोडच्या समस्ये बाबत विनंती निवेदन देऊन लक्षात आणून दिले होते. मागील काही महिन्यांपासून ढेकू रोड ( प्र. जि. मा. -५१ ) या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात सोडून दिल्यामुळे ढेकू रोड व पिंपळे रोड वरील रहिवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून वापरणाऱ्या ज्येष्ठांपासुन सर्व वर्गातील नागरिकांना पाठीचे व मणक्यांच्या आजाराचे त्रास वाढले असुन वाहने खराब होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना वाहन देखभाल दुरुस्तीचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याची अवस्था खराब असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व गोष्टींमुळे ढेकु रोड वासियांच्या जीवितास देखील धोका वाढला आहे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विजय चव्हाण, संजय पाटील, हिम्मत पाटील, बापू वानखेडे, अक्षय चव्हाण, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, कल्पेश पाटील, अधिकराव पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
