
अमळनेर : येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘वक्त्यांची कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. शनिवार, दि.१९ जूलै रोजी विठ्ठल नगर, पिंपळे रोड, अमळनेेर येथील अभ्यासिका केंद्रात कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून दयाराम पाटील, सत्कारार्थी निवृत्त मुख्याध्यापिका सौ. गायत्री भदाणे, सत्कारार्थी निवृत्त पोलीस कॉन्स्टेबल सुनिल महाजन, डॉ. प्रा. राहुल निकम उपस्थित होते.
प्रास्ताविकातून प्रा. अशोक पवार यांनी १ ऑगस्टला एकाच दिवशी दोनशे हून अधिक ठिकाणी विविध शाळा, महाविद्यालय, गावांमध्ये जाऊन समाज सुधारक, साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करुन त्यांचे विचार व कार्य नव्या पिढीसमोर मांडण्यात येणार आहे. याच धर्तीवर पुढील काळात संविधान जागर ही संकल्पना देखील राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते दयाराम पाटील यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून सांगितला. डॉ. राहुल निकम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
सौ. गायत्री भदाणे या सावित्रीबाई फुले विद्यालय, अमळनेर च्या माजी मुख्याध्यापिका आहेत. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत सेवानिवृत्ती बद्दल व पोलीस दलात कार्यरत असताना सुनिल महाजन यांनी समाजसेवेसाठी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याबद्दल त्यांचा अनुक्रमे प्रा. उषा देवरे व निरंजन पेंढारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापुरुषांच्या विचारांच्या प्रचार अभियानात सहभागी होण्याचा निर्णय सौ भदाणे मॅडम व सुनील महाजन यांनी जाहीर केला. वक्त्यांच्या कार्यशाळेत युवा कल्याण प्रतिष्ठानचे मिलिंद निकम, अजय भामरे, अरुण देशमुख, रियाज मौलाना, सुनील वाघमोडे, संजय सूर्यवंशी, ए. एन. घोलप, सुनील अहिरराव, पुरुषोत्तम माळी, चिंधू वानखेडे, अनिता संदानशिव, सुनिता मोरे, भारती कोळी, चेतन जाधव, शेख ताहेर भाई, उमाकांत ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रा. राहुल निकम यांनी तर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती प्रमुख बापूराव ठाकरे यांनी आभार मानले.
