आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल 30 गरजू विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील ३० गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत नाही, तर एक जिव्हाळ्याची जबाबदारी आहे. यातील बरेचसे विद्यार्थी पित्याचे छत्र हरवलेले अनाथ आहेत, तर काहींच्या घरी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. परंतु शिक्षणाचा दिवा विझू नये म्हणून PTA च्या समर्पित शिक्षकांनी त्यांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्याचा वसा घेतला आहे. या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर नि:शुल्क क्लासेस, पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा उपविभागीय अधिकारी, अमळनेर चे नितीन मुंडावरे साहेब यांच्या कार्यालयात PTA संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी केली. साहजिकच PTA क्लासेस संघटनेमुळे शिक्षण म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर समाजसेवेची एक पवित्र प्रक्रिया आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.

प्रतिवर्षी अमळनेर PTA क्लासेस संघटने मार्फत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता फी मध्ये सवलत दिली जाते. प्रांताधिकारी नितीन मुंडावरे साहेब यांनी PTA संघटनेच्या या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक केले. भविष्यात शासन स्तरावरून अशा संघटनांना प्रोत्साहन मिळावे अशी भावना व्यक्त केली. यावेळी PTA चे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर, किरण माळी सर, राकेश बडगुजर सर, सुरश्री वैद्य मॅडम, सुधीर टाकणे सर, सोनल जोशी मॅडम, वैशाली निकम मॅडम, शिरीष डहाळे सर, शेखर कुलकर्णी सर, हर्षल बडगुजर सर, आरिफ पिंजारी सर, ज्ञानेश्वर मराठे सर, स्वर्णदिप राजपूत सर आणि इतर समर्पित शिक्षक सदस्य उपस्थित होते.