साने गुरुजींचे संस्कारक्षम प्रेरणादायी विचार शाळेत व घराघरांत पोहोचविण्यासाठी ‘ साने गुरुजी विचार मंच ‘ स्थापन

जळगाव : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी व समाज चिंतामणी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, लेखक, कवी व आदर्श शिक्षक पूज्य साने गुरुजी यांना ७४ व्या स्मृतिदिनानिमित्त जळगाव येथील काव्य रत्नावली चौकात ११ जून २०२४ रोजी अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी निवृत्तीनाथ कोळी होते. मानवतेची शिकवण देणाऱ्या साने गुरुजींच्या प्रतिमापूजन व ‘ खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…’ या प्रार्थनेच्या समुह गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक आर.डी.कोळी यांनी केले.
विजय लुल्हे यांचेतर्फे ग्रंथभेट : डॉ.कलाम पुस्तक भिशीमार्फत विजय लुल्हे यांनी ‘ महात्मा जोतीबा फुले यांचे ‘अमर जीवन’ हे शास्त्री नारो बाबाजी महाधट लिखित पुस्तक सर्व उपस्थितांना सप्रेम भेट दिले.
भारतरत्न डॉ.ए.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख लुल्हे यांनी मार्गदर्शनात स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजींनी जातीभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले पंढरपूरचे आमरण उपोषण, प्रताप मिलच्या टाळेबंदी विरुद्ध कामगारांचा संघटनात्मक लढा, अमळनेर म्युन्सिपाल्टीच्या जाचक शेतकऱ्यांच्या बैलगाडीचा टोल टॅक्स विरुद्ध लढा, चले जाव चळवळीतील राष्ट्रीय कार्य यातील गुरुजींचा निर्भय, संघर्षशील नेतृत्व व कणखर बाणा प्रसंगोचित सांगितला. मातृधर्मी स्वभावाचे पैलू सांगतांना नकळत अन्याया विरुद्ध सत्यनिष्ठ, निर्लेप वृत्तीने झुंजणाऱ्या साने गुरुजींच्या निर्भय सेनानी या गुणांकडे दुर्लक्ष करतो ही खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शनात निवृत्तीनाथ कोळी यांनी साने गुरुजींचे लेखन कर्तृत्व सांगितले. कवी प्रकाश पाटील व निवृत्ती कोळी यांनी दर्जेदार कविता सादर केल्या. पूज्य साने गुरुजींचे शतकोत्तर रजत जयंती वर्ष असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन व यशस्वी कार्यवाही करण्यासाठी तसेच साने गुरुजींचे संस्कारक्षम प्रेरणादायी विचार शाळेत व घराघरांत पोहोचविण्यासाठी ‘ साने गुरुजी विचार मंच ‘ स्थापन करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर पाटील यांनी केले. यावेळी संतोष मराठे, एन. सी. वाघ, सखाराम कांबळे, भिमाशंकर पाटील आदी साने गुरुजी प्रेमी उपस्थित होते.
