समाजातील सर्व घटकांनी देशभरात सुरु झालेल्या भूमी सुपोषण अभियानात सहभागी व्हावे : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

अमळेनरच्या मंगल भूमीत राष्ट्रीय चळवळीचा झाला शुभारंभ

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : सर्वांसाठी जीवनदायीनी असलेल्या भूमी मातेचा चैत्र शुद्ध वर्ष प्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याला जन्मदिवस असतो. या मंगलदिनी भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा श्री मंगळग्रह मंदिरातून शुभारंभ होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. यात सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे. अन्नदात्या भूमीला आई मानून जैविक शेती करावी, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांनी केले. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.१९ मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिरातून झालेल्या भूमी सुपोषण या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प. पू. स्वामी नृसिंह विजयेंद्र सरस्वतीजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय कार्यवाह बाळासाहेब चौधरी, पद्मश्री डॉ. सुभाष शर्मा, महाराष्ट्र व छत्तीसगड मंदिर महासंघाचे संयोजक सुनीलजी घनवट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भागैय्याजी, अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे, युवा कल्याण व क्रीडा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापनमंत्री ना. गिरीश महाजन, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व्यासपीठावर विराजमान होते. दरम्यान, ना. चौहान यांनी उपस्थित सर्व मंत्री व लोकप्रतिनिधींसह कृषी अवजारांच्या प्रदर्शनाला भेट दिली. रोटरी क्लब व लायन्स क्लब यांनी सर्व शेतकऱ्यांसाठी कैरी पन्ह्याची सोय केली होती.

ना. शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, की चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आपल्या हिंदू नववर्षाची सुरूवात होते. त्यामुळे आपल्या संस्कृतीची आपण जाणीव ठेवावी. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीला माणूस विसरला आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी नैसर्गिक शेती करीत होते. सेंद्रीय खतांचा वापर करत होते. त्यामुळे उत्पादनही चांगले व अन्नातही कस होता. मात्र, आता उत्पादन वाढविण्यासाठी विविध रासायनिक खतांचा वापर सुरू आहे. त्यामुळे भूमी मातेचे शोषण होत आहे. पाणी पातळी ही फुटांवर नव्हे, तर किलोमीटरने खालावली आहे. पेस्टिसाईड्स, इंजेक्शनचा अतिडोस देवून भाजीपाला, फळांचे उत्पादन केले जात आहे. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. हृदयविकार, कर्करोगाचे प्रमाण त्यामुळेच वाढले आहे. रासायनिक खतांचा वापर करून एक पीक नव्हे तर बहुपिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे, हे धोकेदायक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालावत आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी हाच खऱ्या अर्थाने राजाही आहे आणि जीवन देणारा कणा आहे. पाच एकर शेत असेल तर त्यात अर्धा एकर तरी नैसर्गिक शेती करावी. त्यामुळे नक्कीच उत्पादन वाढेल. भूमी सुपोषण संवर्धनासाठी भारतासह जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले आहेत. भारतात १८ लाख शेतकरी आता नैसर्गिक शेती करीत आहेत. त्याचे परिणामही चांगले आले आहेत. भूमी सुपोषित ठेवण्यासाठी आपल्याला जीव, जंतू, पशू- पक्षी सारे सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. हे भूमी सुपोषित करण्याचे अभियान नव्हे, तर आपलेही सुपोषण करण्याचे अभियान आहे. हे एक सामाजिक कार्य आहे आणि ते सर्वांनी मिळून करायचे आहे. भूमी मातेसाठी ममत्वाची भावना ठेवून तीला आई मानावे व नैसर्गिक शेतीचा संकल्प करावा. दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला भूमी मातेची पूजा करून जन्मोत्सव साजरा करावा. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्थेने राबविलेले हे अभियान कौतुकास्पद आहे. जळगावसह महाराष्ट्रातील कृषी विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

दरम्यान, सुरुवातीला राजेंद्र वाघ यांनी स्वावलंबी स्वाभिमानी गीत सादर केले. अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक नवलजी रघुवंशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह देवेंद्र तायडे यांनी सूत्रसंचालन केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील व डॉ. डिगंबर महाले यांनी व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार व स्वागत केले. विशेष म्हणजे मंदिर भेटीत डॉ. महाले यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ना. चौहान यांना सांगितल्या होत्या. कापूस उत्पादकांकडे विशेष लक्ष वेधण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेने हार व बुके कापसापासून बनविले होते. कार्यक्रमाला शेतकरी बंधूंसह विविध पक्षांचे, समाजसेवी व कृषी विषयक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुनीलजी घनवट, पद्मश्री सुभाषजी वर्मा, मनोजभाई सोलंकी, डॉ. गजानन डांगे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन आदी मान्यवरांनी भूमी मातेच्या जन्मदिनी मंगल भूमीतून भूमी सुपोषण संवर्धन राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ होत असल्याचा आनंद व्यक्त केला. केवळ जळगाव, महाराष्ट्र नव्हे, तर देशभरात याअभियानाचा प्रचार व प्रसार होईल असे सांगत आपले विचार मांडले. यात, रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असून सकस अन्नाअभावी त्याचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. साहजिकच गावरान पिकांच्या उत्पादनासाठी सेंद्रीय शेती ही आता काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतीला पोषक वातावरणासाठी शेतीत ३० टक्के वृक्ष लागवड व ४० टक्के सिंचन असणे आवश्यक असून भूमी सुपोषण संवर्धन होणे गरजेचे आहे असे सांगितले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा हा केळी उत्पादक म्हणून भारताला परिचित असल्याने कोल्ड स्टोरेज आदी प्रकल्पांसाठी केंद्रीय कृषिमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांनी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री मंगळग्रह मंदिर झाले देशातील पहिले ‌‘एआय‌’ मंदिर…

अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर आता देशातील पहिलेच ‌‘एआय‌’ मंदिर ठरले आहे. ना. शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सदर एआय प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी यंत्रणा तंत्रज्ञ तुषार भारंबे, डॉ. युवराज परदेशी, चेतन गिरनार व मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेचे लोकार्पण…

याशिवाय, श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संस्थेने सुंदर रोपवाटिका व विविध कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य व्यवस्था केली आहे. या संतश्री सखाराम महाराज रोपवाटिकेचे लोकार्पण ना. शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

देशातील सर्व कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रे यांच्यासह देशातील ७५० जिल्ह्यांमध्ये सदर कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात आला. तसेच ना. शिवराजसिंह चौहान यांच्या फेसबूक व यूट्यूब चॅनेलवरही लाईव्ह दाखविण्यात आला. देशातील व प्रादेशिक न्यूज चॅनेल्स व वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!