गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर आज अमळनेर येथे भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ; तयारी पूर्ण

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची असेल उपस्थिती

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ गुरुवार, दि.१९ मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून होणार आहे. दुपारी २ वाजता आयोजीत या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक महानुभाव तसेच विविध सामाजिक, धार्मिक संस्थांसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासाठीची तयारी श्री मंगळग्रह मंदिर परिसरात पूर्णत्वास आली आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. १८ मार्च रोजी सकाळी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभ सोहळ्याच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा करून सर्व विभागांच्या प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी घुगे यांनी सदर अभियान हे कृषी क्षेत्र अर्थात शेतकऱ्यांच्या संदर्भात असल्याने या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करावा. अमळनेरमधील खानदेश शिक्षण मंडळ, लायन्स व रोटरी क्लबचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील विविध पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी याठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीही अभियानात सक्रीय सहभाग नोदवावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर- पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भैरवीताई वाघ- पलांडे, खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, नगरसेवक सचिन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे, तालुका कृषी अधिकारी सी. जे. ठाकरे, निवृत्त नायब तहसीलदार सी. यू. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय गांगुर्डे, जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोऱ्हाडे, पारोळ्याचे वनक्षेत्रपाल एस. बी. देसले, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, बी. एम. खरे, पी. व्ही. देसले, किशोर माळी, पी. ए. पाटील, भरतसिंग परदेशी, मंगल सिक्युरिटी एजन्सीचे संचालक राजेंद्र यादव, दिनेश शेलकर, अमळनेर आगारप्रमुख प्रमोद चौधरी, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक पितांबर भावसार, कैलास दायमा, नरेंद्र धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, श्रीमती जयश्रीताई साबे, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, प्रशासकीय अधिकारी आर. जी. चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री मंगळग्रह मंदिरात विशेष भोमयागाचे आयोजन…

गुरुवार, दि.१९ मार्च रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी १२ या वेळेत श्री भूमी माता जन्मोत्सवानिमित्त विशेष भोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मानकऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या माध्यमातून पूजाविधी होईल.

५१ फुटी गुढी उभारणार…

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी ९ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवतरित्या ५१ फुटी गुढी उभारण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर गुढीचे पूजन करतील.

दरम्यान, अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेतही आढावा बैठक झाली. यामध्ये भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियान शुभारंभ सोहळ्याच्या तयारीबाबत सविस्तरपणे चर्चा होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे म्हणाले, की देशातील शेतजमीन रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे अत्यंत विषरहीत झाली आहे. त्यामुळे बळीराजापुढे गेल्या काही वर्षांपासून नापिकीचे गंभीर संकट उभे राहिले आहे. या स्थितीला आळा घालण्यासाठी सन २०२१ पासून अक्षय कृषी परिवाराने कृषी व पर्यावरण क्षेत्रांतील विविध सामाजिक आणि धार्मिक संस्था व संघटनांना सोबत घेऊन भूमी सुपोषण व संवर्धन या राष्ट्रीय अभियानाची सुरूवात केली. गेल्या पाच वर्षांपासून हे अभियान देशभरात यशस्वीरित्या राबविले गेले आहे. त्याच अनुषंगाने श्री मंगळग्रह मंदिरात श्री भूमी मातेच्या जन्मदिनी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ होत आहे. या अभियानात आपल्या सर्वांनी भरीव योगदान देत शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जागर करावा आणि हे अभियान यशस्वी करावे. या बैठकीत सहसंयोजक आलोकजी गुप्ता, सचिव डॉ. बेरीदम गुणाकरजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह बाळासाहेब चौधरी आदींनीही चर्चेत सहभाग नोंदविला. यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे व अक्षय कृषी परिवार तसेच मंगळग्रह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या मुख्य स्थळासह सुरक्षा व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, प्रवेश मार्ग आदींची पाहणी केली. दरम्यान, हा अभियान शुभारंभ सोहळा यशस्वितेसाठी अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी परिवार, विविध सामाजिक, धार्मिक संस्था यांचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!