महान संतांचा एकदाच मृत्यू होत नाही तर समाजात त्यांचा वारंवार मृत्यू होतो : प्रा. डॉ. मनोज महाजन

अमळनेरच्या पू. साने गुरुजी वाचनालयात मसापचा संत साहित्य जागर कार्यक्रम संपन्न

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : संत कबीरांनी समाजाला केवळ कोरडे तत्त्वज्ञान ऐकवले नाही तर ऐकवलेले तत्त्वज्ञान समाजामध्ये तळागाळापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांची भक्ती निर्गुण, निराकार, अनंत होती. त्यांनी कोणत्याही एका धर्माचा अथवा दैवताचा प्रचार प्रसार केला नाही. धर्माधर्मात भेद करण्याऐवजी ते धर्माधर्मातील पूल बनले. त्यांनी ज्ञान, विवेक आणि निर्गुण उपासनेला महत्त्व देऊन समाजाला सत्य सांगितले. त्यासाठी त्यांनी राजसत्तेचा विरोध पत्करला. अश्या महान संतांचा एकदाच मृत्यू होत नाही तर समाजात त्यांचा वारंवार मृत्यू होतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मनोज महाजन (एम. जे. काॅलेज, जळगाव) यांनी केले. अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी वाचनालयात संपन्न झालेल्या मसाप शाखा अमळनेर आयोजित संत साहित्य जागर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमळनेर शाखेचे अध्यक्ष संदीप घोरपडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष तथा समन्वयक दिलीप सोनवणे व साहित्यिक प्रा. बी. एन. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन दीपप्रज्वलनाने न करता संत कबीरांचे भजन म्हणणाऱ्या एकतारी भजनी मंडळाने दोहे गाऊन केली. मसाप शाखेतर्फे वक्ते प्रा. डॉ. मनोज महाजन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना डॉ. महाजन यांनी संत कबीर यांचे जीवन, त्यांचे कार्य, त्यांचे साहित्यिक योगदान आणि त्यांच्याबद्दल केले गेलेले आरोप याविषयी विस्तृत स्वरूपामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी केली. संत कबीरांचे दोहे लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्याने ते संकलित करण्यात आले. यामुळे त्यांनी न गायलेले दोहे देखील संत कबीरांचे दोहे म्हणून समाज गातो. त्यातील गुरू गोविंद दोनो खडे.. आणि बडा हुआ तो क्या हुआ.. या दोन दोह्यांचा त्यांनी उल्लेख केला. कबीरांनी राजसत्तेला किंवा समाजाला आवडेल ते न गाता, समाजाच्या भल्यासाठी सत्याची आळवणी केली. यामुळे त्यांना राजसत्ता आणि समाजाचाही विरोध पत्करावा लागला. प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागले. परंतु, न डगमगता त्यांनी सामान्य माणसाची पिडा आणि शास्वत सत्य रोखठोकपणे मांडली. ते नारी विरोधी आणि निराशा जनक साहित्याचे पुरस्कर्ते होते असा त्यांचावर आरोप केला जातो, असे डॉ. महाजन यांनी म्हटले. असे असले तरी त्यांनी समाजाला पूजा, पाठ करण्या ऐवजी निरीक्षण करायचे आणि प्रश्न विचारायचे बळ दिले. हे शास्त्र आणि पुस्तक अभ्यासण्यापेक्षा मोलाचे आहे अशी भूमिका महाजन यांनी मांडली.

अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी अमळनेर मसाप संत विचारांना डोळस पद्धतीने समाजासमोर आणण्याचा नवा प्रयत्न करत असल्याचा मनोदय व्यक्त केला. अशा कार्यक्रमांना ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातूनही रसिक प्रचंड उपस्थिती देतात. यातून पुढील अनेक वर्ष संत विचार समाजातून हद्दपार होणार नाही यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. रमेश माने यांनी केले तर परिचय, आभार प्रदर्शन कार्यवाह डॉ. विजया गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला मसापचे सदस्य नरेंद्र निकुंभ, गोकुळ बागूल, सौ. सुनिता पाटील, मनोहर नेरकर तसेच पत्रकार, वाचनालयाचे सदस्य आणि रसिक श्रोते उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. हा मसापचा सलग सहावा उपक्रम होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!