
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
मुंबई : व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरम, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात अमळनेर येथील पत्रकार ईश्वर रामदास महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सकारात्मक कार्याबद्दल ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ देऊन गौरविण्यात आले. रविवार, दि.१५ मार्च रोजी सायंकाळी मुंबई येथील मंत्रालयासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे पार पडलेल्या भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘महाराष्ट्र भूषण सन्मान २०२५’ तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. ना. ओमप्रकाश शेटे (अध्यक्ष, आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र शासन) होते. तर मा. ना. मंगलप्रसाद लोढा, मंत्री – कौशल्य विकास व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य शासन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला मा. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मा. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई, राणा सूर्यवंशी, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, तसेच चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय सरचिटणीस, व्हॉईस ऑफ मीडिया यांची विशेष उपस्थिती होती. माध्यम क्षेत्रातील मान्यवरांमध्ये प्रसन्ना जोशी (संपादक – पुढारी मराठी वृत्तवाहिनी), विशाल पाटील (संपादक – लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), विनोद तळेकर (संपादक – एनडीटीव्ही मराठी) आणि प्रसाद काथे (संपादक – जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य महासचिव दिव्या भोसले, राज्य सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, तसेच राज्य कोर कमिटी मेंबर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिक, विधायक आणि सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून ईश्वर महाजन यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी विषयांवरील बातम्यांमधून त्यांनी केलेल्या लिखाणाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. मिळालेल्या सन्मानाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संघटना व उपस्थित मान्यवरांचे ईश्वर महाजन यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.