आम्हा बहिणींना भावाकडून काही नको, फक्त प्रेम पाहिजे. प्रेमाने घेण्यातली मजा ओरबाडून घेण्यात नसते : खासदार सुप्रिया सुळे

अमळनेरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी (शरद पवार गट) मेळाव्याला तोबा गर्दी; ‘तुतारी’ ठरतेय लक्षवेधी

जनतेने शुन्य किंमत.. भटकती आत्मा या शब्दांची किंमत दाखवून शरद पवार साहेबांवरील विश्वास कायम ठेवला

अमळनेर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात ३१ जागा जिंकल्या आणि एका जागी विरोधक ५० मतांनी जिंकले आहेत आपण न्यायालयात दाद मागितली आहे. ती जागा लवकरच जिंकू. लोकांनी मतदान केलं आम्ही केंद्रात विरोधात बसलो, निर्णय मान्य केला. लोकसभेला महाराष्ट्रात नव्हे तर इतर ठिकाणी ही महाविकास आघाडीला जनतेने पाठिंबा दिला आहे. याचीच विरोधकांना धडकी भरली आणि मतांसाठी लाडक्या बहिणींची आठवण झाली. लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मला बरेच म्हणतात भावाने काही दिलं नाही. यावर आम्हा बहिणींना काही नको, भावाकडून फक्त प्रेम पाहिजे. प्रेमाने घेण्यातली मजा ओरबाडून घेण्यात नसते असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे काल दिनांक १७ रोजी पार पडलेल्या ‘ताई आपल्या भेटीला’ मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) वर प्रेम करणारे असंख्य चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. विशेष म्हणजे आसन व्यवस्था मधल्या मोकळ्या जागेत देखील चाहते बसले होते काहींनी तर थेट व्यासपीठावर मिळेल तेथे बसून तर काहींनी उभे राहून सुप्रिया ताईंना ऐकले. नाट्यगृहाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

कार्यक्रमाचे सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते थोरांचे प्रतिमापूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बी. एस. पाटील, राष्ट्रवादी नेत्या तिलोत्तमा पाटील, माझी पालकमंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी शिक्षक आमदार दिलीप तात्या सोनवणे, इंदिरा ताई, ॲड. हेमाताई पिंपळे, मंगलताई पाटील, कमल आक्का, वंदना चौधरी, अजित मलिक, श्रीराम  पाटील, डॉ. अनिल शिंदे होते. प्रास्ताविक करताना तिलोत्तमा पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त असून मंत्र्यांचं त्याकडे दुर्लक्ष आहे. दोन वेळा पराभूत असताना ज्यांचे मुळे आमदार झाले त्या साहेबांचा मंत्र्यांनी अनादर केला.. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जनता दुधखुळी नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. यानंतर उपस्थित मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला.

सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, बदल हे होतच असतात. मी एका पुरोगामी विचार असलेल्या घरात जन्माला आले. इथे मुलगा आणि मुलीमध्ये कधीच अंतर नव्हतं. आपल्यापेक्षा वडीलधारी जी लोक असतात ना त्यांचा मान सन्मान करायचा आणि आपल्या ज्येष्ठांच्या विरोधात न जाता वेळ पडली तर एक पाऊल मागे घेणं ह्याला आपले संस्कार म्हणतात. त्यामुळे अनेक वर्ष मी फार कधी जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत. घरातले बाहेरचे एक कुटुंब म्हणून पक्षात काम करायचे. कुटुंबाचे अध्यक्ष वडील नात्याने आदरणीय पवार साहेब यांचं स्थान होतं आणि वडिलांच्या जागेवर एका माणसाला नेता मानून आम्ही सगळे कुटुंब म्हणून काम करायचं. सुखदुःखात लग्नकार्य कोणी आजारी पडले की आम्ही एकत्रच.

दिल्लीतील अदृश्य शक्तीने केलं कुटुंब उध्वस्त करण्याचं पाप…

दिल्लीतील अदृश्य शक्तीला आमचं सुख पाहवले नाही. आमच्या आयुष्यात एक वादळ आलं. या अदृश्य शक्तीने आमचं घर उध्वस्त केलं. घर म्हणजे काय फक्त पवार कुटुंब नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा. कुटुंब उध्वस्त करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते दिल्लीतील अदृश्य शक्तीने केलं. मला अभिमान वाटतो की, महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला रडत बसत नाही तर ती लढते. माझ्यावर अनेक लोक टीका करतात लोक मला विचारतात तुम्हाला वाईट नाही का वाटत ? कारण की मी जिथे उभी आहे मला माहिती आहे की मी खरंच कोणाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये पैसे खाल्ले नाहीत, पाच पैशाची कुणाला लिंपित नाही. माझी बिलं कोणी भरत नाही आणि मीही कोणाची बिलं भरत नाही. राजकारणात पैसे कमवायला आलेले नसून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आले आहे. आज जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालले आहे ते बदलवण्यासाठी, सुसंस्कृत महाराष्ट्रातले संस्कार परत आणण्यासाठी आपल्याला पुढची विधानसभा लढायची आहे. यासाठी जोमाने कामाला लागावे लागेल, कष्ट करावे लागतील ते काही सोपं नाही. कारण.. विरोधक साम -दाम -दंड -भेद वापरतील. त्यांना पैशाची कमी नाही. त्यांना असं वाटतं पैसे वाटले की माणसं विकत मिळतात. ‘पन्नास खोके.. तुम्हाला ओके’ असे सांगत आम्ही रामकृष्ण हरी वाले अर्धी भाकरी कमी खाऊ, उपाशी झोपू पण स्वाभिमानाने जगू. रस्त्यावर अमळनेरला जाताना मला पन्नास खोकेवाला चाललाय हे ऐकायची माझी ताकद नाही. सत्य परेशान होता मगर पराजित नही. भाजपने ईडीचा धाक दाखवला. सत्तेसाठी पक्षाचे ते जे काही टाटा बाय-बाय करून गेले ते एक गोष्ट घेऊन जाऊ शकले नाही ती म्हणजे ईमानदार जनता. एक लक्षात आलं नातं घट्ट राहिलं तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर आहे.

आता महाराष्ट्र समोर खूप मोठी आव्हाने आहेत. लोकांची प्रतिनिधी असताना तुमच्या माझ्यात अंतर आलं तर मग माझं कामच काय ? लोकांची प्रतिनिधी आहे तर तुमचं सगळं सुखदुःख समजून घ्यावं, फक्त भाषण नाही केलं पाहिजे. आम्हाला महिन्यातून दोनदा पाणी येतं ते रोज करा सांगणारी बालिकेचा उल्लेख करत केंद्र सरकार १० टीएमसी पाणी आपल्याला नाकारतंय त्यासाठी लढा उभारु आणि उत्तर महाराष्ट्र ला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः जातीने या प्रश्नाकडे पाहू, तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासित केले. मराठा, धनगर आरक्षणाच्या बाबतीत रोजच तसं करतात मी आरक्षण देणार म्हणतात. पाण्याच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीतही असंच करतात. देशांमध्ये काँग्रेसच्या काळात या सगळ्या गोष्टी झाल्या. विचारा किती शाळा, कॉलेजेस काढली ? संजय गांधी निराधार योजनांमध्ये किती महिलांना पैसे दिले ? कधीतरी महिला आहे तिला मदत करू शकलो हे आमचं भाग्य. कधी कार्यक्रम करून आम्ही शोबाजी केली नाही तर तिच्या सुख दुःखात सहभागी झालो.

पैसे बँकेतून तातडीने काढा.. यांचा भरोसा नाही

लाडक्या बहिणींना जे प्रत्येकाच्या बॅंक अकाउंट मध्ये पैसे येतील ते पैसे बँकेतून तातडीने काढा कारण यांचा भरोसा नाही. एक नाही दोन वेळा पोटातलं ओठात आलं. भाजपा सरकार मध्ये असलेले दोन आमदार म्हणाले की, जर मतदान केलं तर ठीक नाहीतर डिसेंबर मध्ये पैसे देणार नाही. त्यांना हेच माहिती नाही की डिसेंबर मध्ये त्यांचं सरकार आहे का ? यापुढे या राज्यात कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही. छत्रपतींचा, शाहू फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मानच होणार. या वेळेस तुम्हाला पैसे द्यायला लागलेत. आपलं सरकार आल्यावर घर बसल्या तुमच्या घरी दर महिन्याला पैसे आणू. तुम्हाला रांगेत उभा करणार नाही. सुरक्षितता वाढवून शिक्षण देऊ, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभा करू ? पूर्वी फक्त काचेच्या बांगड्या दिसायच्या आणि हात दिसायचे त्या माऊलीचा चेहरा कोणी बघितला नव्हता पण आज तीच माऊली उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेत आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत येथे तुमच्या सही शिवाय विकास होत नाही. महाराष्ट्र एकच माणसाला समजतो.. ते नाव फक्त शरद पवार असे त्या म्हणाल्या.

अहिराणी भाषामा मंत्री ना समाचार…

अहिराणी भाषेमध्ये मंगलाताई पाटील यांनी ‘मातेल मंत्री’ उपमा देत विरोधकांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या.. जो माणूस दिल्ली पुढे झुकना नही असा पवार साहेबना तू मातेल मंत्रीनी अपमान करा… तुले जनता पाडणार शे. स्कीम ते सर्व आणतस. शेतकरी, युवक, दारु वर बोलाले तुले टाईम नही. पैसामुये माती जाएल शेत. पक्षाना तुकडा करात. महागाई वर बोलन का.. बजेट दखाडतस. शेतकरी राजा एकच.. पवारसाहेब.

तत्पूर्वी मनोगत व्यक्त करताना दिपाली बेहरे या विद्यार्थिनीने बापाच्या संकटकाळी सुप्रियाताईनी दिलेली साथ विशद केली. महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. हेमाताई पिंपळे, मंगलताई पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, श्रीराम पाटील, गुलाबराव देवकर यांनीही मेळाव्यात समानतेचा अधिकार, पंचायत राज, बेटी बचाव बेटी पढाव चा नारा, जीवनावश्यक सर्व वस्तूंवर कर, शेतकरी प्रश्न, आरक्षण, महिला अत्याचार आदी वर संबोधित केले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (श. प. गट) तर्फे सुप्रियाताईंचे स्वागत करण्यात आले. सानेगुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे दयाराम पाटील यांनी सुत्रसंचलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, रिटाताई बाविस्कर, प्रा. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत निकम, अनंत निकम, किसान सेलचे मनोहर पाटील, अरुण शिंदे यांचेसह अनेक निष्ठावंत पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!