
अमळनेर : गुजरात मध्ये अतिवृष्टी झाल्याने सुरतहून भुसावळ कडे येणाऱ्या प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांचे हाल होत असल्याचे लक्षात घेऊन येथील लायन्स व रोटरी क्लबच्या समन्वयकांनी तत्काळ जेवण उपलब्ध करून एक प्रकारे मानवतेचे दर्शन घडविले. गुजरात मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भुसावळ कडे येणाऱ्या काही गाड्या रद्द असून काही गाड्या उशिराने धावत आहेत. गुजरातहून भुसावळ कडे येणारी बडौनी एक्सप्रेस अमळनेर येथे पहाटे ४.२० वाजता पोहोचते. ही गाडी तीन तास उशिराने ७.२० वाजता अमळनेेर पोहोचली. ही गाडी पुढील तीन तास अमळनेेर स्टेशनवर थांबली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास येणारी दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस देखील दुपारी १ वाजता आली. या गाडीतील लहान मुले वृत्त मधुमेहाचे रुग्ण यांना वेळेवर भोजन न मिळाल्याने ते भुकेने व्याकुळ होते. रेल्वेतील काही प्रवाशी तसेच स्टेशन मास्तर रवी पांडे यांनी रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला (बोहरी) यांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी तात्काळ आपल्या समन्वयकांना सांगितले व या मानवतेच्या कार्यासाठी लायन्स व रोटरी क्लबचे सर्वच धावले.
दोन्ही संघटनांच्या माध्यमातून प्रवाशांना खिचडी, चिवडा, पोहे व पाणी उपलब्ध करुन दिले. प्रवाशांना वेळेत जेवण मिळाल्याने त्यांनी अमळनेर करांचे आभार मानले. यावेळी योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, ताहा बोहरी, महेश पाटील, महेंद्र पाटील, विनोद अग्रवाल, नितीन विंचुरकर, अनिल रायसोनी, प्रफुल्ल सिंघवी, अभिजीत भांडारकर, प्रशांत सिंघवी, गोटू गांधी, राजू नांढा, प्रितपालसिंग बग्गा, बंडू जैन यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अमळनेर स्टेशनवर प्रवाशांसाठी येथील लायन्स व रोटरी क्लबच्या समन्वयकांनी तत्काळ जेवण उपलब्ध करून मानवतेचे खरे दर्शन घडविले.
