अपात्र कुलगुरु डॉ. अजित रानडे व निवड समितीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी

पुणे : देशभरात नावाजलेल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निकषांनूसार १० वर्षे प्राध्यापक पदाचा अनुभव त्यांच्याकडे नाही. अजित रानडे यांची नेमणूक २०२२ मध्ये झाली परंतु त्यांची नेमणूक UGC चे सर्व नियम धाब्यावर बसवून झालेली आहे. कुलगुरु पदासाठी UGC च्या नियमावलीनुसार नामांकित विद्यापीठात १० वर्षे प्राध्यापक पदाचा अनुभव किंवा नामांकित संशोधन संस्था (उदा.IGIDR, IISC, NCL etc.) किंवा शैक्षणिक प्रशासकीय संस्था (उदा. NEILPA, MSFDA, UGC etc) इ. मध्ये १० वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या निकषांमध्ये अजित रानडे कुठेच बसत नाहीत. कुलगुरु शोध आणि निवड समितीने निकषांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ॲड. कौस्तुभ पाटील यांनी केला. डॉ. रानडेंच्या वादग्रस्त निवडी संदर्भात त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी डॉ. रानडे यांच्या संदर्भातील विविध कागदपत्रे आणि तथ्ये समोर मांडली. UGC ने दिलेल्या माहिती नुसार डॉ. रानडे यांच्या वर चौकशी समिती गठीत केली आहे. शासनाची फसवणूक केली म्हणून अपात्र कुलगुरु डॉ. अजित रानडे यांना निलंबित करुन त्यांच्यासह निवड समितीवर फौजदारी कारवाई करावी असा इशारा ॲड. कौस्तुभ पाटील यांनी दिला आहे.
ॲड. कौस्तुभ पाटील म्हणाले की, २०२२ मध्ये यूजीसीचे नियम धाब्यावर बसवून डॉ. अजित रानडे यांची कुलगुरु पदावर नेमणूक झाली आहे. त्यांच्याकडे १० वर्षे प्राध्यापक पदाचा अनुभव नाही. आम्ही वेळोवेळी ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र या बद्दल गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात बेकायदा कुलगुरु होण्याचा हा पायंडा शैक्षणिक हिताला बाधक आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ शकते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, गोखले अर्थशास्र संस्थेचे विद्यमान कुलपती बिबेक देबरॉय, राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॉ. रानडे यांना तात्काळ निलंबित करावे. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शोध निवड समिती आणि डॉ. रानडे यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. त्यांच्यावर झालेल्या खर्चाची वसुली करावी. तसेच शामला गोपीनाथ, प्रा. सब्यासाची बासू रेचौधरी व प्रा. महेंद्र देव यांना काळ्या यादीत टाकून शासनाने येथून पुढे कोणत्याच समितीवर नियुक्त करू नये.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्या गोखले अर्थशास्र संस्थेच्या पदवीदान समारंभाला येणार आहेत. अजित रानडे यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर, त्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ॲड. कौस्तुभ पाटील यांनी दिला आहे.
गोखले अर्थशास्र संस्थेचे अपात्र कुलगुरु…
पुण्यातील नामांकित गोखले अर्थशास्र संस्थेचे कुलगुरु डॉ. अजित रानडे हे कुलगुरु पदासाठी पात्र नाहीत. अजित रानडे यांची नेमणूक २०२२ मध्ये झाली परंतु त्यांची नेमणूक UGC चे सर्व नियम धाब्यावर बसवून झालेली आहे. कुलगुरु पदासाठी UGC च्या नियमावलीनुसार नामांकित विद्यापीठात १० वर्षे प्राध्यापक पदाचा अनुभव किंवा नामांकित संशोधन संस्था (उदा. IGIDR, IISC, NCL etc.) किंवा शैक्षणिक प्रशासकीय संस्था (उदा. NEILPA, MSFDA, UGC etc.) इ. मध्ये १० वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. या निकषांमध्ये डॉ. अजित रानडे कुठेच बसत नाहीत.
सार्वजनिक डोमेन मध्ये उपलब्ध असलेल्या CV प्रमाणे डॉ. अजित रानडे यांची महाविद्यालय/ विद्यापीठ शैक्षणिक कारकीर्द पाहता, रानडे यांना UGC नियमानुसार प्राध्यापक पदाचा फक्त १ वर्षाचा अनुभव आहे. यात, १) होली क्रॉस कॉलेज, यूएसए येथे सहायक प्राध्यापक पदी २ वर्षे. २) ब्रायंट कॉलेज, यूएसए येथे अभ्यागत सहायक प्राध्यापक पदी २ वर्षे. ३) इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबई येथे सहायक प्राध्यापक पदी ५ वर्षे. ४) इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स, नवी दिल्ली येथे प्राध्यापक पदी १ वर्षे असून यातील अनुक्रमांक ४ वगळता अनुक्रमे १,२,३ हे UGC नियमानुसार ग्राह्य नाही. ऑगस्ट २००० ते २०२२ पर्यंत अजित रानडे खाजगी कंपनी मध्ये कार्यरत होते. कुलगुरु शोध आणि निवड समितीनेही ही बाब दुर्लक्षित केली. या समितीच्या अध्यक्षा RBI च्या माजी डेप्युटी गव्हर्नर श्यामला गोपीनाथ ह्या होत्या. आणि प्रा. सब्यासाची बासू रेचौधरी व प्रा. महेंद्र देव हे सदस्य होते. शोध आणि निवड समितीला माहित होते की, डॉ. अजित रानडे यांच्याकडे आवश्यक अनुभवाची कमतरता आहे. तरीही समितीने त्यांच्या नावाची शिफारस करुन शासनाची फसवणूक केली आहे. अजित रानडे यांच्या निवडी मागे समितीचे काही आर्थिक हितसंबंध गुंतले असण्याची शक्यता आहे.
निवड समितीसोबत डॉ. रानडेंचे हितसंबंध…
अजित रानडे स्वतः गोखले इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य असताना कुलगुरु निवडीच्या शोध समितीवर महेंद्र देव यांची नेमणूक केली. महेंद्र देव आणि रानडे यांचे खूप वर्षापासून मैत्री पूर्ण संबंध आहेत. त्यांनी १९९८ मध्ये एकत्रितपणे लेखही लिहिला आहे. ही गोष्ट गोखले अर्थशास्र संस्थेची पालक संस्था सर्व्हंटस् ऑफ इंडिया ने तत्कालीन कुलपती राजीव कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली. संस्था सर्व्हंटस् ऑफ इंडियाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अजित रानडे हे कुलगुरु निवडीच्या प्रक्रियेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य म्हणून सुरवातीपासूनच सहभागी आहेत आणि रानडे यांनीच प्रा. महेंद्र देव यांचे नाव शोध आणि निवड समितीसाठी सुचविले आहे त्यामुळे या मध्ये त्यांचे हितसंबंध दिसून येतात. परंतु शोध समितीने यांनी हे पत्र दुर्लक्षित करून अजित रानडे यांची नेमणूक केली. अजित रानडे पात्र नसतानाही त्यांची नेमणूक करणे म्हणजे जे प्राध्यापक कुलगुरु पदासाठी पात्र आहेत त्यांच्यावर अन्याय आहे. अपात्र उमेदवार शिक्षण संस्थेच्या प्रमुखपदी नेमले जात असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. पात्र उमेदवारांना डावलले जात असेल तर शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान होईल असेही ॲड. कौस्तुभ पाटील यांनी सांगितले.