कलाली, दोधवद, हिंगोणे, निंभोरा येथे दिलेले कापसाचे वाण बोगस असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकाऱ्यांसह शेतात जाऊन केले प्रत्यक्ष पंचनामे

अमळनेर : तालुक्यातील कलाली, दोधवद, हिंगोणे, निंभोरा गावातील शेतकऱ्यांनी टाटा कंपनीचे ईशा कापुस वाण खरेदी करुन शेतात लागवड केली आहे. कापसाचे पीक चार महिन्यांचे झाले. कापसाचे पीक सहा फूट उंच वाढ होवूनही त्या शेतात एकही कैरी नाही. एवढेच नव्हे तर फुल पाती, फुगडी देखील नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाण असलेल्या कपाशीला काही प्रमाणात कैऱ्या आहेत. यामुळे दिलेले कापसाचे वाण बोगस असल्याचा दावा संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील, बाजार समितीचे संचालक सुरेश पिरण पाटील यांनी मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, कृषी सहाय्यक योगिता लांडगे, कंपनी प्रतिनिधी कृष्णा सुकासे यांचेसह शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व पंचनामेही केले.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी याबाबत कंपनी प्रतिनिधीला वेळोवेळी कल्पना दिली. त्यांनी काही दिवस वाट पाहण्यास सांगितले. कंपनीने सांगितल्याप्रमाणे फवारणी केली, खते लावली, शेंडा खोडला. तरी काहीही फायदा झालेला नाही. अशा तक्रारी शेतकऱ्यांनी सांगितल्या. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्याच्या पावत्या व रिकामी पाकीटे जपून ठेवली होती तीदेखील उपस्थितांना दाखवली. फक्त दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याने काहीच उत्पन्न नसेल तर आम्ही कसे जगायचे ? असा प्रश्न करत कंपनीला जबाबदार धरा अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असेही सांगितले.

कंपनी प्रतिनिधी म्हणून आपण काय पाठपुरावा केला ? काही पत्रव्यवहार असेल तर दाखवा अशी विचारणा प्रा. सुभाष पाटील यांनी संबंधितांना केली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेतकरी महेंद्र ठाकरे, राकेश पाटील, पप्पु पाटील, प्रमोद दगाजीराव, राहुल भागवत, प्रवीण भागवत, नरेंद्र बाबुराव आदींच्या नुकसान झालेल्या शेतात पंचनामे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी नेते सुभाष पाटील यांनी केली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!