राज्यभरातील दृष्टिहीन कलाकार करणार सादरीकरण

अमळनेर : शहरातील इंदिरा भुवन येथे दि. २६ सप्टेंबरला सायंकाळी ७ ते १० या वेळेत इंदिरा भुवन येथे दृष्टिहीन कलाकारांचा ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे. यात चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून राज्यभरातील दृष्टिहीन असलेले गायक व वादक कलाकार कलेचे सादरीकरण करणार आहेत. अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रुप मधील सर्व दृष्टिहीन कलाकारांचा कौटुंबिक खर्च भागविला जात असतो. या कार्यक्रमासाठी अमळनेर नगरपरिषदेचे सहकार्य लाभत असून इंदिरा भुवन चे राजेंद्र वाणी यांनी हॉल उपलब्ध करून दिला आहे.
अंध अपंग प्रगती सोसायटी ट्रस्ट चे सेक्रेटरी तात्या पानपाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना सांगितले की, गेल्या २० वर्षापासून अंध कलाकारांच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत असून आतापर्यंत राज्य भर कार्यक्रम झाले आहेत. ग्रामीण भागात अंध व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि ते देखील दृष्टी सोडली तर इतर लोकांप्रमाणे बुद्धिवान आहेत हे समजावे यासाठी च अमळनेर शहरात प्रथमच हा कार्यक्रम घेत आहेत. यासाठी १०० रुपये तिकीट आकारणी होत असली तरी यातून अंध कलाकारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च आम्ही करत असतो, सर्व कलाकार हे मानधनावर असून अमळनेर येथे कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून १२ ते १५ अंध कलाकार येणार असून यात, तीन ते चार महिला कलाकार आहेत.
यात ‘चला हवा येऊ द्या’ मधील प्रसिद्ध कलाकार प्रविण पाटील व अनेक पुरस्कार प्राप्त असलेली अमरावती येथील पूजा शेंद्रे सह दुर्गा गवई -अकोला, निर्मला शिरसाठ -शहादा, पुष्पराज पवार -सटाणा, कमलाकर कुंभार -शिरपूर, प्रविण पाटील -धुळे, विनय वाघ -धुळे, चंद्रकांत मैलागीर -अमळनेर आदी कलाकार येणार आहेत. सदर कार्यक्रमाचा खर्च मोठा असतो. पैसा कमविणे नव्हे तर अंध कलाकारांचा घरखर्च भागवणे व लोकांचे मनोरंजन करणे हा उद्देश असल्याने सर्वांनी कार्यक्रमास जास्तीतजास्त संख्येने उपस्थिती द्यावी. शक्य असेल तर विविध सामाजिक संस्था आणि दानशूर सामाजिक कार्यकर्त्यांनी यथाशक्ती मदत करावी किंवा तिकीट विक्री साठी मदत करावी, असे आवाहन सेक्रेटरी तात्या पानपाटील यांनी केले. यावेळी किशोर शिरसाठ व चंद्रकांत मैलागीर उपस्थित होते.