कुटुंबात संस्कारच होतच नसतील तर मुलं बिघडली असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही
अमळनेर : भारतातल्या लोकांजवळ सगळं असणं हेच त्यांना नकोसं वाटायला लागलं की काय ? आनंद उपभोगता येत नाही अशी आपली परिस्थिती झाली आहे. आपण सगळे अस्वस्थ का आहोत ? समाज अस्वस्थ आहे कारण आपल्यामध्ये धर्मभेद, जातीभेद, पंथ भेद आहेत. एकमेकांविषयी मनामध्ये द्वेष आहेत. एकंदरीत सामाजिक प्रदूषणामुळे सगळा समाजच अस्वस्थ आहे का ? याचा विचार आपण केला पाहिजे. त्यासाठी थोडसं मागील काळाकडे गेलं पाहिजे. जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आणि आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो असे मत अहिल्या नगर येथील प्रा. डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाड्मय मंडळ व र. का. केले सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर ४ थे पुष्प गुंफताना ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप जोशी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. मयुरी जोशी उपस्थित होते. सोबत विचार मंचावर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष अविनाश जोशी, संदीप घोरपडे, प्रा. डॉ. पी. बी. भराटे, अजय केले होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती चे पूजन झाले. यानंतर मान्यवरांचा व देणगीदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
- डॉ. जोशी दांपत्याने राखले वेळेचे भान…
- आम्हाला अतिथीचा हा मान मिळाला याबद्दल डॉ. संदीप जोशी यांनी व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. तर सौ. मयुरी जोशी यांनी वेळेचे भान राखून शारदीय व्याख्यानमाला म्हणजे विचारांची मेजवानी असते. आमचं बोलणं आपण नेहमीच ऐकत असता. ज्या मान्यवरांना कार्यक्रमासाठी बोलावलं आहे त्यांना ऐकण्यासाठी आम्ही आतुर असल्याचे सांगितले.
प्रा. डॉ. संजय कळमकर पुढे म्हणाले की, सन २०२० मध्ये कोरोना विमानातून आला. कोरोना काळात काय झालं ? हे आपण सर्वांनी पाहिलं. ज्यांना बेड मिळाले ते गेले, ज्यांना मिळाले नाही ते वाचले. आजची पिढी त्यातून सुधारेल, जागृत होईल ही आशा फोल ठरली. तो दोन वर्षाचा काळ आपण अत्यंत धैर्याने पार पाडला. आपल्यातील काही राहिले तर काही दुर्दैवाने गेले. आज आपलं अस्तित्व टिकून आहे हाच कोरोना नंतरचा सगळ्यात मोठा आनंद आहे.
- कालच्या दोन आनंददायी घटना…. कालच्या दोन आनंददायी घटनांचा त्यानी सुरुवातीला उल्लेख केला.
- पहिलं म्हणजे कालच अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ असे झाले. अहिल्यादेवींचं खूप मोठं कार्य या भागामध्ये आहे ते भाग्य उजळले.
- दुसरं म्हणजे मराठी भाषेला राजभाषेचा अभिजात दर्जा मिळाला. कधी कधी राजकारणातून जे चांगलं बाहेर पडतं तो हा प्रकार आहे. विधानसभा जवळ आल्यामुळे हे निर्णय झाले की काय ? असा उपरोधिक टोलाही लगावला. पण.. जे निर्णय झाले त्याबद्दल आनंद असल्याचे कळमकर म्हणाले.
महाराष्ट्रातील एकंदर तोडफोडीमुळे मराठी भाषा जगातील अभिजात असावी हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं हे सत्य आहे. अमळनेरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हा पायगुण असावा. साहित्य संमेलनाला अनेक कवी, लेखक आले. जगामध्ये सगळ्यात आनंदी देश कुठला ? यावर १४८ देशांचा सर्व्हे झाला. त्यामध्ये भारताचा नंबर १२८ वा आहे. पहिल्या क्रमांकावर फिनलंड वगैरे सारखे छोटे देश आहेत इथपर्यंत ठीक आहे. पण पाकिस्तानचा नंबर १०८ आहे म्हणजे आपल्याही आधी आहे. ज्या देशात पेट्रोल, डिझेल आदी सर्व महाग आहे. तेथे लोक पाव खातात, नीट जगायला नाही. तरीही ते लोक भारतातल्या लोकांपेक्षा आनंदी आहेत. गत काळातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, पूर्वीच्या काळी कुठलंही मनोरंजनाचं साधन नव्हतं. रेडिओ एकच साधन होतं. रेडिओला लायसन सुद्धा होतं. वसंत साठे नभोवाणी मंत्री असताना लायसनची पद्धत रद्द झाली आणि रेडिओ सगळ्यांना ऐकायला फ्री झाला. गावामध्ये नाटक असलं की सगळं गाव ते नाटक पाहायला जमा व्हायचं. नाटकात चूका झाल्या तरी आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे आणि आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो. कालांतराने तंत्रज्ञान बदलत गेले, टीव्ही, मोबाईल चा जमाना आला. तंत्रज्ञान माणसाच्या सोयीसाठी वाढलं पण माणसं कामासाठी वेळ कमी देतात. आलेली बातमी फोटो न वाचता तशीच फॉरवर्ड करण्यात येते. इंस्टाग्रामवर खोटी माहिती देऊन फसवले जात आहे. यामुळे पालकांनी मुलांना सावध करायला हवे. पूर्वी लवकर उठून सर्व कामे केली जात असत आता मात्र वेगळं चित्र आहे. झोपला तिथेच जग सुखी झालं… वाढदिवस श्रद्धांजली मेसेजचा खच असतो. लोक आभासी जगात वावरताना दिसतात. भिंतीवर दोन लाख रुपयांचा एलईडी असतो मात्र घरात पुस्तक नसतं. इतकं आपण तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. कुटुंबात संस्कारच होत नसतील तर मुलं बिघडली असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. दुःखद प्रसंगी सांत्वन करताना आपण काय करतो याचं भान नाही. यामुळे समाजाच्या आरोग्याची भिती वाटू लागली आहे. डॉक्टर देखील वाढले पाहिजेत. जुन्या काळी फारसं आजारपण नव्हते. असलंच तर विना औषधाने दूर जाई. त्याच त्या गोळ्या तेच लाल औषध असे. पांढऱ्या पेशी कधी वाढत नव्हत्या. कारण ईच्छा शक्ती दांडगी होती. स्वार्थापायी आता गुणवत्ता नसलेल्या इंजिनिअर कडून सरकारी कामे होतात, पूल बनवले जातात, डॉक्टर होतात. मात्र पुढे परिस्थिती काय होईल ? याचाही विचार झाला पाहिजे. मुले दडपणामुळे आत्महत्या करतात. सगळी सरकारी कामे शिकवणं सोडून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिली जातात. ‘आम्हाला शिकवू द्या’ असं म्हणत मोर्चा काढण्याची वेळ या देशातल्या शिक्षकांवर यावे इतकं दुर्दैव आहे. सरकारी शाळेतील मुले कसे शिकतील ? सध्या तर मार्कशीटवर मार्क ऐवजी सरसकट ग्रेड देण्याची पद्धत सुरु आहे. हुशार कोणाला म्हणावे..?
मुलांना १६ व्या वर्षांपर्यंत संस्कार द्यावे असं जयवंत दळवी म्हणतात. मतदानाचा अधिकार असूनही शेवटच्या क्षणापर्यंत पैशाशिवाय मतदान होत नाही ही शोकांतिका आहे. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी फक्त हजेरी लावतात.. कोणाला काय शिकवणार ? शिक्षणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पहावे. महिलांनी आई जिजाऊ होऊन संस्कार करावे लागतील. बदलत्या अनेक रुढी परंपराही विशद केल्या. उपवास करणं ही वेदनेतून निर्माण झालेली परिस्थिती असल्याचे सांगितले. आम्ही अस्वस्थ असलो की जगही अस्वस्थ वाटतं. एकंदरीत आपल्या संवेदना हरवल्या आहेत. संसारात दूरदृष्टी नको तर जवळीक पाहिजे. आनंदी जगलं पाहिजे. आनंद वाटायला शिकलं पाहिजे. आनंद देणाऱ्यांना आनंद मिळतो. वाट्याला आलेलं दुःख सर्वात मोठं न मानता ते छोटं मानायला शिका. कोरोनाने शिकवूनही आम्ही सुधारलो नाही. भविष्यात तरुणाईला पश्चात्ताप होतो.
जसं वय वाढत जाते तसं बोलावं वागावं लागतं.. असा मौलिक सल्ला वृध्दत्वाकडे झुकलेल्यांना दिला. निसर्गाने वृध्दत्वाची सोय केली आहे.. आनंद घेत रहा. सूर्य उगवताना जशा विविध छटा असतात तसच मावळत्या काळातही विविध छटा दिसतात. सकारात्मक विचार करावेत ते आपल्यावर अवलंबून असते. जुने लोक पुस्तकावर सशक्त झाले यामुळे पुस्तके वाचायला हवीत असाही सल्ला दिला. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शिला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंग लाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापुरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे यांनी तर आभार बन्सीलाल भागवत यांनी मानले.