तेरा वेळा आंदोलन, राज्यभरात साखळी उपोषण करुन महामंडळासाठी उभारला होता तीन वर्ष मोठा लढा
राज्यभर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या सर्व कार्यालयांसमोर फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद उत्सव
मुंबई (प्रतिनिधी) : जगभरामध्ये ४३ देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी तब्बल तीन वर्ष लढा दिला होता. साखळी उपोषण, आंदोलन, मागण्यांचे निवेदन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १२ मिटिंग केल्यावर आज अखेर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व शिलेदार, पदाधिकारी, सदस्य यांनी राज्यभर आपला आनंद उत्सव साजरा केला.
मंत्रालयासमोर आंदोलन, आझाद मैदानावर आंदोलन, नागपूर अधिवेशन काळात आंदोलन, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील समोर आंदोलन, विभागीय आणि राज्यात साखळी आंदोलन असे तब्बल तेरा मोठी आंदोलने केल्यावर आज अखेर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी असणाऱ्या महामंडळाला मंजुरी दिली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या सुपीक कल्पनेतून पत्रकारांसाठी, वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी महामंडळ असावे ही मागणी पुढे आली होती. त्यानंतर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या माध्यमातून तब्बल तीन वर्ष या मागणीसाठी राज्यभर लढा उभारला होता. माध्यमांमध्ये काम करणारा पत्रकार आणि त्या पत्रकारितेचा खरा चेहरा असणारा वृत्तपत्र विक्रेता या दोघांचेही स्वतंत्र महामंडळ असावे, अशी संकल्पना सातत्याने पुढे येत गेली. अनेक आंदोलनांनंतर आणि मागण्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल १२ वेळा या संदर्भातल्या बैठका घेतल्या, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ने आझाद मैदानावर केलेल्या अनेक आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी विनायक पात्रुडकर यांना पाठवून व्हॉईस ऑफ मीडियाचे साखळी उपोषण सोडवले होते. तब्बल तेरा वेळा मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग झाल्यावर चार दिवसांपूर्वी शेवटची मिटिंग झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महामंडळाला मंजुरी घेण्यासाठी पुढाकार घेतो, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या सोबत वारंवार केलेल्या मिटिंगमधून या कामाला अजून अधिकची गती मिळाली. दोन महामंडळ या मागणीवर मंत्रिमंडळाने अखेर आज शिक्कामोर्तब केले. याशिवाय पत्रकारांचे असणारे अनेक विषय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले, त्यालाही मंजुरी देण्यात आली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांचे दूरध्वनीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री हेमंत पाटील, आ. सत्यजित तांबे यांनी अभिनंदन केले. आज राज्यभरामध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व कार्यालयांसमोर फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.