प्रा. अशोक पवार, के. डी. पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज; महाविकास आघाडीतील बिघाडी विरोधकांच्या पथ्यावर
अमळनेर : महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस मधील इच्छुकांचे प्रयत्न सुरु होते. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी व नंतरही महाविकास आघाडीत बिघाडी दिसून आली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी कॉंग्रेस पक्षातील काही कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात जाऊन बैठका घेणे, बैठकीत अनुपस्थित राहणे, पक्षाचा प्रोटोकॉल न पाळणे असे प्रकार घडले. अर्थातच असे घडण्यामागे दोन्ही बाजूने काही सबळ कारण असू शकते. राष्ट्रवादी चे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत होते हे खरे असले तरी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आणि तिकीट मिळविण्यासाठी चुरस वाढली. अखेर राष्ट्रवादीचा तिढा न सुटल्याने ही मिळणारी जागा सहजच कॉंग्रेस पक्षाला मिळाली.
‘महाविकास आघाडीकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी सर्व जण खंबीरपणे उभे राहून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू’ असे म्हणणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आता वेगळी वाट धरली आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला असताना ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील प्रा. अशोक पवार व के. डी. पाटील यांनी बंडखोरी करत काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. अशोक पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपजिल्हाधिकारी एच. टी. माळी होते. त्याचप्रमाणे के. डी. पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात, एक अर्ज अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षातर्फे दाखल केले आहेत. के. डी. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, डी. डी. पाटील, माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, मनोज पाटील, तुषार संदानशिव यांचेसह कार्यकर्ते हजर होते. यशवंत मालचे, प्रतिभा रवींद्र पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महाविकास आघाडीतील बिघाडी विरोधकांच्या पथ्यावर…
महाविकास आघाडीतील बंडखोरीचा फायदा निश्चितच विरोधकांना होणार आहे. माघारी पर्यंत चित्र स्पष्ट होईलही पण.. आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी एक पाऊल मागे घेऊन महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना जवळ करायची हीच वेळ आहे. बिघाडीतून पुन्हा सर्व काही सुरळीत होईल. अन्यथा.. महाविकास आघाडीतील बिघाडी विरोधकांच्या पथ्यावर पडेल