महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत सखाराम महाराज वाडीत घेतले महाराजांचे आशिर्वाद
अमळनेर : कमी वेळात चांगले नियोजन करुन महाविकास आघाडी पुरस्कृत अधिकृत उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी आज उपविभागीय अधिकारी नितिन मुंडावरे यांच्याकडे उमेदवारीचा अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. अनिल शिंदे यांनी संत सखाराम महाराज वाडी मध्ये महाराजांचे आशिर्वाद घेतले. तेथून मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत रॅली काढण्यात येऊन उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. बी. एस. पाटील, महिला राज्यप्रमुख तिलोत्तमा पाटील, उबाठा गटाच्या ॲड. ललिता पाटील उपस्थित होत्या.
अमळनेर शहरातील वाडी चौक -जैन मंदिर -सराफ बाजार -मांगिरबाबा -पाच कंदील मार्ग -डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा -हुतात्मा चौक -समशेरसिंग पारधी स्मारक -सुभाष बाबू स्मारक -साने गुरुजी स्मारक -स्वामीनारायण मंदिर -गौसे पाक दर्गा -बौद्ध विहार -छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -बळीराजा स्मारक या मार्गाने रॅली तहसील कचेरी आवारात सांगता झाली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कटीबध्द असल्याचे शक्ती प्रदर्शन करुन दाखवून दिले.
बंडखोरी नव्हे.. ते आमचेच डमी उमेदवार..
- काल दि.२८ रोजी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. अशोक पवार व काँग्रेसचे के. डी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ती बंडखोरी नसून ते आमचेच महाविकास आघाडीचे डमी उमेदवार आहेत. आम्ही सर्व सोबत आहोत व असू असे डॉ. अनिल शिंदे यांनी स्पष्ट केले.
डॉ. रवींद्र चौधरी यांनी डॉ. अनिल शिंदे यांचा केला सत्कार…
- महाविकास आघाडीची उमेदवारी रॅली माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयाकडून जात असताना हिरा उद्योग समूहाचे डॉ. रवींद्र चौधरी यांनी डॉ. अनिल शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावरुन माणसाचं मन किती निर्मळ व मोठं असावं ? याची प्रचिती उपस्थितांना आली. याप्रसंगी शिरीष दादा मित्र परिवाराचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा एकच सूर होता. ‘चला परिवर्तनाचे साक्षीदार होऊ या’ या घोषणांनी परिसर ढवळून निघाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे ठरवले. शेतकरी, कर्मचारी, कामगार, युवक, महिला यांना न्याय देण्यासाठी, महागाई रोखण्यासाठी महाविकास आघाडीने डॉ. अनिल शिंदे यांच्या रूपाने उमेदवारी दिली असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व आजी -माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्र व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, छोटे मोठे व्यावसायिक, युवा, शेतकरी, महिला यांची उपस्थिती दिसून आली. डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारीसाठी मिळालेले समर्थन हीच विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.