राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे बळीराजाला घास भरवून दिवाळीची सुरुवात !

दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही तर हा ज्ञानाचा सण : प्रा. डॉ. लिलाधर पाटील

अमळनेर : येथील राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या सर्व जिवाभावाच्या लोकांसाठी आज बुधवार, दिनांक ३० ऑक्टोबर रोजी फोर्टस् , ढेकू रोड, अमळनेर येथे दिवाळी निमित्त चहा पाणी – फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विचार मंचावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल शिंदे, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, शेतकरी दांपत्य श्री व सौ. दिनेश पाटील व राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा बळीराजा प्रतिमेचे पूजन करुन बळीराजाला घास भरवून दिवाळीची सुरुवात केली. शेतकरी दांपत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला.

बळीराजा विषयी माहिती विषद करताना प्रा. डॉ. लिलाधर पाटील म्हणाले की, अमळनेर शहरात गेली तेरा वर्ष बळीराजाची मिरवणूक काढत आलो आहोत. हा उपक्रम अनेक ठिकाणी अपरिचित असला तरी अमळनेरकरांना बऱ्यापैकी परिचित आहे. ‘ईडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असं आमची बहीण भावाला ओवाळतांना म्हणते. पत्नी पतीला ओवाळताना म्हणते यावरून भारतीय संस्कृती लक्षात येते. या बळीच्या नावाने दक्षिण भारतात महाबलीपुरम नावाने शहर वसलेले आहे. पूर्ण दक्षिण भारतामध्ये ‘ओनम’ नावाचा सण साजरा होतो.

या ओनम सणाच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये नवनवीन कपडे घालतो. त्याप्रमाणे दक्षिण भारतामध्ये ओनमच्या दिवशी गरीबातला गरीब माणूस कर्ज काढेल, कोणाकडून पैसे घेईल परंतु कुटुंबातील सर्वांना नवीन घेतो. याचं कारण जर तिथे जाऊन विचारलं तर ते सांगतात की, हा पाताळात घातलेला बळीराजा आहे. त्याला पाताळात घालताना त्याने एक वरदान मागितलं होतं की.. या ओनमच्या दिवशी मला पृथ्वीवर एक दिवस येण्याची परवानगी द्यावी. त्या दिवशीच त्या बळीराजाच्या मनात काळजी कसली ? तर बळीराजाच्या मनातन काळजी आहे की माझा शेतकरी, सामान्य माणूस कुटुंबातील स्त्रिया या सुखी आहेत की नाही ? हे पाहण्यासाठी तो येतो. तेव्हा आपण दुःखात असलो तरी आपले दुःख, कष्ट आपल्या राजाला दिसता कामा नये म्हणून लोक पैसे उसनवार घेतात नवीन कपडे परिधान करतात आणि तो दिवस पूर्ण आनंदात राहतात. विचार करा हजारो वर्षानंतर देखील आज सुद्धा आमच्या मनामध्ये बळीराजाच काय स्थान आहे. लोक विचार करतात की त्याला आपण दुःखी दिसता कामा नये कारण आपलं दुःख पाहिलं तर तो वर्षभर दुःखी राहील म्हणून हे केलं जातं. संत तुकाराम महाराज, कबीर यांनी सुद्धा बळी हा ग्रेट असल्याचे सांगितले आहे. महाभारतामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने बळीचा उल्लेख केलेला आहे. महाभारतात सांगितले आहे की, राज्य हे बळीसारखं करावं आणि म्हणून हे बळीच राज्य आहे. बळी हा राक्षस होता असे सांगितले जाते तर मग शेतकरी कष्टकरी महिला ज्या बळीचं राज्य यावं म्हणून प्रार्थना करतात तो राक्षस कसा ? आपण आजही राक्षस म्हणतो. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही तर हा ज्ञानाचा सण आहे. हा संस्कृतीचा असणे हा आपल्या परंपरा आपले राजे आणि आपले असलेले लोक यांना पूजनाचा सण आहे. दिवाळीपर्यंत हा सांस्कृतिक प्रवास या निमित्ताने आपण समजून घेऊ या. या बलिप्रतिपदेच्या निमित्ताने या बळीराजा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी असे नम्रपणे आवाहन केले. राजकारणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांपर्यंत न्याय पोहोचावा म्हणून आपण प्रयत्न करु अशी अपेक्षा बाळगली.

डॉ. अनिल शिंदे म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती नसताना मागील वर्षी त्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. मात्र आपल्याकडे दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पदरात काहीच नाही. मागील निवडणुकीत व नंतर पाडळसे धरणाचं गाजर दाखवले गेले. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. शेतात जायला शेतरस्ते नाहीत. मुलभूत गोष्टी सोडून इतर गोष्टी कमीशन साठी केल्या जातात. लाखो जागा रिक्त असूनही त्या न भरता करारावर नेमणूका होतात. अशा नियुक्त केलेल्या व्यक्ती ला फारसे देणंघेणं नसतं. अशा गोष्टींवर कोणी बोलत नाही. दिवाळीपासून नैसर्गिक बदल होतात तसा आता बदल हवा आहे. राजकारणात दुसरी नवीन पिढी तयार व्हायला हवी. आतापर्यंत तीनही दादांना संधी दिली यावेळी मला संधी द्या अशी विनंती केली. यासाठी महाविकास आघाडीतर्फे मी शेवटची टर्म विधानसभा निवडणूक लढवित असून आपण मला विजयी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक, महिला, युवा वर्ग, पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी केले तर श्याम पाटील यांनी बळीराजा शिवार फेरीत शेती, शाळा, आरोग्य आदी समस्यांबाबत चिंता व्यक्त करुन मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहू असे सांगत उपस्थितांचे आभार व्यक्त केले. उपक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा फाऊंडेशनचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!