जामनेरच्या चव्हाण बंधूंवर पोलीसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने माझ्या जीवाला धोका : विजय पाटील
अमळनेर : ऑप्टिकल फायबर टाकण्याचा कंत्राट देतो असे सांगून जामनेरच्या राहुल चव्हाण व सागर चव्हाण या बंधूनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केली असल्याचा आरोप अमळनेरचे विजय धनराज पाटील यांनी दिनांक ३० ऑक्टोबर रोजी अमळनेेर येथे नांदेडकर सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. आरोप करताना त्यांनी याबाबत झालेले कॉल रेकॉर्डींग ऐकविले. बॅंक खातेउतारा वर तारखेनुसार पैसे दिल्याच्या नोंदी असल्याचे सांगितले. आपण संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने माझ्या जीवाला धोका असल्याचेही ते म्हणाले. सुमारे साडे अकरा लाख रुपये घेऊन दोन्ही बंधूंनी विजय पाटील यांची फसवणूक केली आहे.
विजय धनराज पाटील हे अमळनेर येथील पवन चौक येथील रहिवासी असून येथेच व्यंकटेश एंटरप्रायझेस नावाची त्यांची फर्म आहे. धरणगाव येथील सहकारी सुतारे सह जामनेर येथील राहुल दत्तात्रय चव्हाण, सागर दत्तात्रय चव्हाण या दोघांनी विजय च्या घरी दिनांक १५.८.२०२० रोजी येऊन तुम्हाला ऑप्टिकल फायबर (इंटरनेट केबल) चे कंत्राट देतो असे सांगून मोबदल्यात १५ लाख रुपयांची मागणी केली. दिनांक २५.८.२०२० रोजी २ लाख रुपये रोकड धरणगाव येथील त्यांचे सहकारी सागर सुतारे यांच्या घरी, दिनांक २७.१०.२०२० रोजी ६ लाख रुपये संबंधिताच्या श्री उद्योग समूह या खात्यावर RTGS द्वारे व दिनांक २३.११.२०२० रोजी ३ लाख ५० हजार रुपये त्यांचे सहकारी सागर सुतारे यांच्या बॅंक खाती RTGS द्वारे याप्रमाणे एकूण ११ लाख ५० हजार रुपये विजय यांनी टप्प्याटप्याने दिले. मात्र दोघे चव्हाण बंधूनी ऑप्टिकल फायबर केबलचा ठेका दिला नाही वा पैसेही परत दिले नाहीत. विजय ने पैशाची मागणी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘तगादा लावू नको अन्यथा तुला संपवून टाकू’ अशी धमकी दिली. यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. दरम्यान या गुन्ह्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विजय पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यांनी यावेळी सांगितले की परिस्थिती नसताना कर्ज काढून, घर गहाण ठेवून मी या लोकांना पैसे दिलेत, आता पैसे मिळत नसल्याने मी आर्थिक तणावाखाली आहे, अनेकांची वेगवेगळ्या ठिकाणी फसवणूक झाली असताना राजकीय दबदबा मुळे त्यांना फावत आहे, असे प्रकार करून त्यांनी मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर जीवाला धोका असला तरी फसवणूक केलेल्या इतरांना सोबत घेऊन मोठा लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.