अमळनेर शहरातील नागरिक आणि कामगारांच्या जिवाशी होणारा खेळ उघड; जिवंत माणसांच्या आरोग्यासाठी ‘मेलेली‌’ फवारणी !

न. पा. चा बेरहम कारभार चव्हाट्यावर; जबाबदार कोण ?

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील पालिकेतर्फे कीटकनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बीएचसी पावडर व इतर केमिकल्सबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये पॅकिंग झालेले आणि २०२४ मध्ये मुदत संपलेले केमिकल सध्या वापरात असल्याचे उघड झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनीही एक्सपायरी मटेरियल वेळेत नष्ट (डिस्पोज) करण्यात आले नाही, अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बीएचसी पावडरच्या थैलीवर उत्पादन दिनांक नमूद असला तरी स्पष्ट एक्सपायरी डेट छापलेली नाही. काही थैल्यांवरील मुदत आधीच संपल्याचे सॅनिटरी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आहे. तरीही हेच केमिकल्स शहरात फवारले जात असल्याने नागरिकांच्या तसेच फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याची टीका होत आहे.

पालिकेच्या सत्तांतरानंतर नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सभापती यांची राजवट सुरू होऊन आता दोन महिने झाले आहेत. या दोन महिन्यात लोकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या अत्यंत गंभीर बाबींबाबत लक्ष देण्यास कोणालाच वेळ मिळाला नाही काय ? की सुरू असलेल्या अत्यंत जीवघेण्या प्रकाराबाबत सर्वांचीच मूक संमती आहे ? अशी शंका उपस्थित होते. मुख्याधिकारी व आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी तर नगराध्यक्षांच्या पदभार स्विकारण्यापूर्वीपासूनच सेवारत (?) आहेत. गंभीर आरोग्यविषयक बाबीकडे संबंधितांचे दुर्लक्ष का ? मुळातच जितके केमिकल्स लागतील तितकेच मागविले पाहिजेत. एक तर पालिकेने आवश्यकतेचा अंदाज न घेता जादा माल मागविला असेल किंवा आलेला माल एक्स्पायर होईपर्यंत तो वापरलाच नसेल. एक्स्पायरी डेटेड केमिकल्स तत्काळ नष्ट करण्याची एक पद्धत आहे. त्याची दीर्घकाळ अंमलबजावणी न करून संबंधितांनी नागरिक आणि कामगारांच्याही जिवाशी अक्षम्य खेळ खेळलेला दिसून येतो.

असा उघड झाला गैरप्रकार…

सोमवार, दि. २ मार्च रोजी सकाळी ७ वाजता नगरसेवक डॉ. डिगंबर महाले व भरत ललवाणी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सिंधी कॉलनीत गेले होते. तेथे डॉ. महाले यांनी बीएचसी पावडरची थैली पाहिली. त्यावर मॅन्यूफॅक्चरींग आणि एक्स्पायरी या दोन्हीही तारखा नव्हत्या. तसेच केमिकलच्या कॅनवर मॅन्यूफॅक्चरींग २०२३ चे होते आणि एक्स्पायरी डेट २०२४ ची होती. याबाबत डॉ. महाले यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक कंडारे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून संबंधित गैरप्रकाराची माहिती दिली. मात्र, या दोन्ही अधिकाऱ्यांनी आम्ही रजेवर आहोत, रुजू झाल्यावर माहिती घेतो असे सांगितले. यावर डॉ. महाले व श्री. ललवाणी यांनी थेट पालिकेचा आरोग्य विभाग गाठला. तेथे आरोग्य निरीक्षक संतोष जाधव व श्री. बच्छाव यांना त्यांनी एक्स्पायरी डेटेट औषधींबाबत विचारणा केली. त्यावर श्री. बच्छाव यांनी नजरचुकीने दिले गेले असे सांगितले. त्यामुळे श्री. जाधव व श्री. बच्छाव या दोघांना घेऊन डॉ. महाले व श्री. ललवाणी यांनी पालिकेचे आरोग्य विभागाचे गोडावून गाठले. तेथे एक्स्पायरी डेटेट माल भरपूर प्रमाणात आढळला. तसेच निकृष्ट दर्जाचे झाडू (खट्टा), डस्टबिन व अन्यही साहित्य होते.

दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांनीही साहित्याच्या निकृष्ट दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला झाडू मिळत नाही, अशी तक्रार एका बाजूला होत असताना, प्रत्यक्षात गोदामात मोठ्या प्रमाणावर झाडू साठवलेले असल्याची चर्चा आहे. मात्र, हे झाडू अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून दोन दिवसही टिकत नाहीत, अशी तक्रार कामगारांनी केली आहे. हीच बाब डस्टबिनच्या बाबतही आहे. कामगार म्हणतात की, आम्हाला डस्टबिन उपलब्ध करून दिले जात नाहीत. प्रत्यक्षात मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गोडावूनमध्ये भरपूर डस्टबिन आहेत. एक्सपायरी झालेली पावडर व केमिकल्स सर्रास वापरणाऱ्यांविरोधात कोणती कारवाई होणार ? दोषींवर जबाबदारी निश्चित केली जाणार का ? असा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे. शहरातील आरोग्यव्यवस्था आणि स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली चाललेल्या या बेफिकीर कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या प्रतिक्रिया अशा…

  • गोदामामध्ये जुने साहित्य असून त्याची गुणवत्ता योग्य नाही. ते कर्मचाऱ्यांना देणे उचित नाही. विभागप्रमुख म्हणून मला एक महिना झाला आहे. तेथे एक्सपायर झालेले साहित्य पडून आहे. साधारणतः 2024- 25 मध्ये ते एक्सपायर झालेले आहे. नवीन फवारणी केमिकल व औषधांसाठी मागणी करण्यात आलेली आहे. – – संतोष जाधव, आरोग्य निरीक्षक
  • एक्स्पायरी संपलेल्या औषधींबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत प्रत्यक्ष गोडाऊनवर जाऊन पाहणी करणार आहे. गोडाऊन मध्ये पडलेला माल किती ? त्याची एक्सपायरी डेट काय आहे ? याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. — प्रशांत निकम, उपनगराध्यक्ष.
  • पूर्वी प्रशासकीय कालावधीत आतापर्यंत जो काही साहित्य पुरवठा करण्यात आला आहे याची माहिती घेण्यात येईल. संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असतील, त्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. — डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष.
  • शहरात अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साथीचे रोग फैलावून जनसामान्य त्रस्त होऊ नयेत, यासाठी लोकांच्या कष्टाच्या व घामाच्या कररुपी पैशातून पालिका विविध प्रकारच्या फवारण्या करीत असते. त्यासाठी लागणारे केमिकल्स जर निकृष्ट दर्जाचे आणि मेलेले वापरत असतील तर असे करणारे म्हणजेच लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचाही जीव टांगणीला लागेल अशी कारवाई झाली पाहिजे. आमदार अनिलदादा पाटील यांनी सदर गंभीर प्रकाराबाबत विधिमंडळात आवाज उठवायला हवा, तर पालिकेचे मार्गदर्शक माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही संबंधितांना वठणीवर आणले पाहिजे. मी याबाबत सर्वत्र लेखी तक्रारीही करीतच आहे. — डॉ. डिगंबर महाले, नगरसेवक
  • माझ्या वॉर्डात दीर्घकाळापासून अनेक समस्या आहेत. त्यातही स्वच्छतेच्या तर खूपच गंभीर समस्या आहेत. संबंधितांनी वॉर्डाच्या साफसफाईकडे कमालीचे दूर्लक्ष केले आहे. माझ्या वॉर्डात मोठ्या प्रमाणावर दलित, आदिवासी तसेच अल्पसंख्याक नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. आज माझ्या वॉर्डातील स्वच्छता मोहीम राबविताना एक्स्पायरी डेटेट केमिकल्स पाहून फक्त धक्काच बसला नाही, तर संबंधित यंत्रणा किती बेरहम व माणुसकी कोळून प्यालेली आहे याची जाणीव झाली. संबंधितांना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. — भरत ललवाणी, नगरसेवक
Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!