अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचा पहिला पुतळा लवकरच

शेतकरी सभेत या शेतकरी प्रेरणा स्मारकाचे लोकार्पण व शेतकरी सन्मान होणार

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रेरणा स्मारकाच्या स्वरूपात लवकरच उभारणार असल्याचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले. या स्मारकातील बैलगाडे व शेतकरी यांचे पुतळे नुकतेच बाजार समितीत आणले त्याचे पूजन करण्यात आले. लवकरच भव्य शेतकरी सभेत या शेतकरी प्रेरणा स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल. याप्रसंगी विविध विकास कामांचे भूमीपूजन व शेतकरी सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे अमळनेरच्या विकासाला गती देण्यात मोठा हातभार लावलेला होता. साहजिकच येथील शेतकरी व सामान्य जनतेशी त्यांचे नाते जुळले होते. माजी मंत्री आ.अनिल पाटील, माजी आ.कृषीभूषण साहेबराव पाटील, मा. नगराध्यक्ष स्व. सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा यांनी वेळोवेळी अमळनेरच्या विकासाला निधी उपलब्ध करून दिलेला होता. अजितदादांच्या या भरीव योगदानाची आठवण म्हणून येत्या मार्च महिन्यात बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समिती आवारात स्व. अजित पवारांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभारला जाईल. त्याचे काम लवकरच पूर्णत्वास येत आहे. बैलगाडी आणि त्यावर शेतकरी रुपात स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभा राहणार आहे. सदर स्मारकातील बैलगाडे, धान्य कापणारा शेतकरी व धान्याचे पोते उचलणारा शेतकरी असे पुतळे आज समिती आवारात आणण्यात येऊन स्मारकावर बसवण्याचे काम सुरु करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, संचालक डॉ.अनिल शिंदे आदींच्या हस्ते पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकार, सचिव डॉ. उमेश राठोड, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, व्यापारी योगेश महाजन आदींसह पुणे येथील मूर्तिकार शिंदे, परिसरातील शेतकरी, हमाल मापाडी व कर्मचारी उपस्थित होते.

असे असेल अजितदादांचे स्मारक…

महाराष्ट्रात स्व.अजित दादांना मानणारा मोठा वर्ग आहे. साहजिकच अजित पवारांच्या स्मारकाची मागणी होत असली तरी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यात पहिला पुतळा उभारुन बाजी मारणार हे निश्चित आहे. बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ चौथऱ्यावर बैलगाडी आणि त्यावर शेतकरी रुपात स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभा राहणार आहे. शेजारी धान्य कापणारा शेतकरी व धान्याचे पोते उचलणारा शेतकरी असे पुतळे असतील. या स्मारकाची एकूण उंची १५ फूट असेल. अजित दादांचा पुतळा त्यांच्या उंची एवढाच असेल. हे स्मारक शेतकऱ्यांसह अमळनेर तालुक्यातील जनतेला प्रेरणा, धाडस आणि ऊर्जा देत राहील.

सदर शेतकरी सभेत बाजार समितीला प्राप्त झालेल्या बोनस मधून शेतकऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येणार आहे. आ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने तसेच खा. श्रीमती स्मिता वाघ यांचेसह उपसभापती सुरेश पाटील, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी, गुमास्ता यांच्या सहकार्याने अमळनेर बाजार समितीने विविध शेतकरी हिताचे उपक्रम राबवत प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे. शिस्त, पारदर्शीपणा यामुळे बाजार समितीत आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. त्यामुळे पणन च्या कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली. सुपरिव्हीजन फी, अंशदान आदी बाबींच्या नियमिततेमुळे पणन कडून बाजार समीतीला व्याजाच्या ५ टक्के असा सहा लाखाचा बोनस मिळाला आहे. त्यातून येणाऱ्या मार्च महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात येणार असून बाजार समितीच्या आवारात १३६ दुकान गाळे बांधण्यात येत आहेत, लेखापाल कार्यालय बांधण्यात आले आहे. पातोंडा उपबाजारात वे ब्रिज बांधण्यात आले आहे. बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तर मारवड उपबाजार समितीत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे या विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित शेतकरी भवन, हमाल मापाडी भवन, व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेड चे भूमिपूजन करून नवीन कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आगामी काळात उन्हाळ्यात लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत थंड पेय ची सुविधा करण्यात येईल तर हिवाळा किंवा पावसाळ्यात मोफत चहा ची सुविधा उपलब्ध असेल. ज्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती चालते त्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान वार्षिक सभेत केला जाणार असल्याचेही सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!