आनोरे येथे धनदाई महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी कार्यशाळा संपन्न.

(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : ‘पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर एक सकारात्मक बदल होऊ शकेल. यासाठी मानसिकता तयार व्हावी म्हणून विद्यापीठामार्फत शेतकरी सहाय्यता कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे असे प्रतिपादन उद्घाटक सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर यांनी केले. धनदाई महाविद्यालयामार्फत आनोरे येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व धनदाई महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी सहायता उपक्रमांतर्गत एकदिवसीय कार्यशाळा आनोरे येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच प्रतिनिधी संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, नरेंद्र पाटील, पोलीस पाटील विनोद पाटील, रायचंद पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील, मार्गदर्शक गोकुळ बोरसे समन्वयक डॉ. शैलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. जयवंतराव पाटील यांनी केले. यानंतर आपला विभाग शेतीप्रधान असल्याने कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून शेतकरी सहाय्यता कार्यशाळा आयोजित केल्या असल्याचे उद्घाटक डॉ. नेरकर यांनी याप्रसंगी सांगितले. पहिल्या सत्राचे मार्गदर्शक शेती अभ्यासक व मार्गदर्शक गोकूळ बोरसे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची योग्य कार्यपद्धती स्पष्ट केली. सरकारी योजनांचा गरजूंना लाभ व्हावा म्हणून आपणही काळजी घेतली पाहिजे असे सांगून त्यांनी विविध त्रुटींवरील उपाययोजना स्पष्ट केली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी औषधी वनस्पती व नगदी पिकांकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रात डॉ. शैलेश वाघ यांनी कृषी पर्यटन हे नव्याने विकसित होत असलेले क्षेत्र असून खानदेशात अजून याचा विकास झाला नसल्याचे सांगितले. यामुळेच आपल्या भागातील शेतकऱ्यांना ही संधी असल्याचे सांगून त्यांनी त्यासाठी आवश्यक पायऱ्या स्पष्ट केल्या.
यानंतरच्या सत्रात आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त अंबू नथ्थू पाटील यांनी आधुनिक शेती व नगदी पिके या विषयावर मार्गदर्शन केले. तर ग्रामसेवक नितीन पाटील यांनी शेती संबंधित विविध सरकारी योजनांची माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून या कार्यशाळेमुळे यांच्याशी संवाद साधता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शेतीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान नक्कीच मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. राहुल इंगळे यांनी तर आभार डॉ. प्रशांत पाटील यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी धनदाई महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.