‘परिवर्तन’ जळगाव निर्मित ‘पालखी’ नाटकाने प्रति पंढरपूर अमळनेेर नगरी दुमदुमली; सुमारे ५० कलाकारांचा अभिनय

नाट्यगृह ठरलेल्या वेळेआधीच प्रेक्षकांनी खच्चून भरले; रसिक भक्तीरसात रंगले

अमळनेर : लेखक दि. बा. मोकाशी लिखित, ‘परिवर्तन’ जळगाव निर्मित शंभू पाटील दिग्दर्शित दोन अंकी ‘पालखी’ या नाटकाचा प्रयोग रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे झाला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स जळगाव यांनी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. नाटकासाठी विनामूल्य प्रवेश होता. यासाठी पासेस सुविधा करण्यात आली होती. ठरलेल्या वेळेआधीच नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. उशिरा आलेल्या अनेक प्रेक्षकांना सीट उपलब्ध न झाल्याने नाट्यगृहाच्या आतील पायऱ्यांवर बसून व भिंतीलगत उभे राहून नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा लागला. सुरुवातीला आयोजकांतर्फे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे  संचालक सुशीलकुमार बाफना आणि श्रीमती नयनतारा बाफना तसेच परिवर्तन नाट्य संस्थेचे शंभू आण्णा पाटील यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. याचप्रमाणे मध्यंतरात ॲड. ललिता पाटील यांनीदेखील विठ्ठल रखुमाई ची मुर्ती व भगवतगीता ग्रंथ भेट देऊन आयोजकांचा सत्कार केला. आयोजकांतर्फे टाकरखेडा येथील वारकरी संप्रदायाचे महाराज यांचाही सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना म्हणाले की, दुकानाला पन्नास वर्षे पूर्ण झालीत हे सगळं आपल्यामुळे शक्य झाले. मग या आपल्या सर्व लोकांना काय द्यायचं ? तर त्यांना सोन्यासारखा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम द्यायचा विचार मनात आला म्हणूनच हा नाट्यप्रयोग तुमच्यापर्यंत आणला असल्याचे सांगितले.

  • लेखक दि. बा. मोकाशी लिखित ‘पालखी’ नाटकातील प्रमुख अभ्यासकाची भूमिका रंगकर्मी हर्षल पाटील यांची असून दिग्दर्शन शंभू अण्णा पाटील यांनी केले आहे. नाटकाच्या माध्यमातून अमळनेरच्या रसिकांना वारीचा जिवंत अनुभव दिला. सुमारे ५० नाट्य कलाकारांनी वारकऱ्यांमधील पांडुरंगाचे दर्शन घडविले. यातील चिमुकल्यांची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याचप्रमाणे प्रापंचिक प्रसंग, वृद्धत्वातील आनंद, मदतीचे प्रसंग, संत गाडगेबाबांची शिकवण सारख्या अनेक गोष्टीतून चांगला संदेश सहजपणे रसिकांपर्यंत पोहोचविला. कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी ॥ लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥ या संत सावता माळींच्या अभंगावेळी तसेच.. धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥ या संत जनाबाईंच्या अभंगावेळी रसिकांनी ठेका धरला.

ज्येष्ठ रंगकर्मी तथा ‘परिवर्तन’ नाट्य संस्थेचे शंभू आण्णा पाटील यांनी अमळनेर गावच वेगळं असून खूप सुंदर आहे असे सांगत अमळनेरच्या रसिक जनतेला सलाम करुन रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. त्यांनी प्रा. लिलाधर पाटील, राजमुद्रा फाऊंडेशनचे शामभाऊ पाटील, रणजित शिंदे, दिलीप सोनवणे, संदीप घोरपडे, भाऊसाहेब देशमुख, आर. सी. बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील यांचा नामोल्लेख केला. या माणसांनी हा चमत्कार घडवला. इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं तसं अवघड होतं. हे सांगताना नुकत्याच अमळनेर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनातील मेहनतीची आठवण करुन दिली. अमळनेर सारख्या ठिकाणी नाट्यगृह निर्माण करून ते जपलं जातं हे विशेष. हे  कठीण नाटक आहे. या नाटकाचा प्रयोग करणे अत्यंत खर्चिक आणि तीन लाखाच्या खाली याचा खर्च नाही. असं नाटक आपण आज रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्यामुळे आपण बघत आहात. हा माणूस खानदेशात येतो, वर्षाला दोनशे रुपये कमावणारा माणूस आज दोन हजार कोटींचा व्यवसाय उभारतो ही सक्सेस स्टोरी असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हणले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे. ‘पालखी’ नाट्यप्रयोगाने अमळनेर करांना पंढरपूर वारीचा जिवंत अनुभव दिला. रसिकांनी मनमुराद आनंद घेत दाद दिली.

नाट्यप्रयोगासाठी पत्रकार बांधव, राजकीय, शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाट्यप्रयोग यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील प्रा. लिलाधर पाटील, राजमुद्रा फाऊंडेशनचे शामभाऊ पाटील, रणजित शिंदे, दिलीप सोनवणे, संदीप घोरपडे, भाऊसाहेब देशमुख, आर. सी. बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील, डॉ. अविनाश जोशी, प्रकाश वाघ यांच्यासह आर. सी. बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील, पूज्य साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, राजमुद्रा फाउंडेशनचे कार्यकर्ते, बापूराव ठाकरे, रामेश्वर भदाणे, दयाराम पाटील, प्रेमराज पाटील, दर्पण वाघ, गोलू पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!