
अमळनेर : तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीस स्व.आर.आर आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला असून शासनाकडून पुरस्कार स्वरूपात दहा लाखाचा निधी ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाला आहे. पंचायत समिती गटविकास अधिकारी एन. आर. पाटील. विस्तार अधिकारी चिंचोरे, कठळे व त्यांच्या टीमने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच चंद्रकलाताई पाटील. माजी सरपंच पायल सुनिल पाटील. उपसरपंच आलेश प्रल्हाद धनगर, सदस्य प्रा. सुनिल पाटील, कौमोदी पाटील, कविता बाविस्कर, जितेंद्र वाडेकर, रविंद्र कोळी, विनोद पाटील, ग्राम पंचायत अधिकारी इच्छाराम बाविस्कर आदी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक बाबींचा अभ्यास करून, गावातील अत्यावश्यक गरजा लक्षात घेऊन, लोकहिताच्या कामांवर सर्व पदाधिकाऱ्यांचे लक्ष असते. स्वच्छता व ग्रामस्थांचे आरोग्य राखण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय सुविधा, वापर, सांडपाणी व्यवस्थापन, आवश्यक तेथे शोषखड्डे करून दिले आहेत. डास निर्मूलनासाठी वेळोवेळी फॉगिंग केले जाते. सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा, त्याच्या दुरुस्त्या, स्ट्रीट लाईट, गंजलेले पोल बदलणे, वाढीव पोल अशा गोष्टींकडे विशेष लक्ष असते. शुद्ध पिण्याचे पाण्यासाठी सुंदर असे ॲक्वा भवन आहे. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक त्या बाबी ग्रामपंचायत उपलब्ध करून देते. त्यात सुंदर किचन शेड, संगणक कक्ष, स्वतंत्र ॲक्वा युनिट, हॅन्डवॉश स्टेशन, प्रत्येक वर्गात पंखे लाईट, स्वतंत्र टॉयलेट व बाथ,परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे यासह शाळेला संरक्षण भिंत आहे. शिवाय गावात एलईडी दिव्यांचा वापर, सौर पथदिवे, वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा देखील प्रयत्न असतो. केंद्र व राज्य पुरस्कृत अनेक योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्याचा १०० % प्रयत्न असतो. ग्रामपंचायत कर आकारणी व विविध अभिलेख, संगणकीय दाखले याबद्दल विशेष काळजी घेतली जाते. दरवर्षी लेखापरीक्षण होते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व म्हणून पुस्तकांची उपलब्धता, प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ यासाठी सदस्य प्रयत्न करतात.आमदार व खासदार निधीतील कामे दर्जेदार करून घेण्याचा प्रयत्न असतो.यासाठी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांचेही सहकार्य वेळोवेळी लाभते.म्हणून अशा पुरस्कारापर्यंत पोहोचता येते. सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
