क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त १०१ ठिकाणी व्याख्याने; युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संस्थेचा उपक्रम

अमळनेर : वाचन संस्कृती व सादरीकरण कौशल्य वाढावे या उद्देशाने अमळनेेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त एकाच दिवशी १०१ ठिकाणी व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात अमळनेर, चोपडा, पारोळा तालुक्यांचा समावेश होता. प्रा. डॉ राहुल निकम यांनी चोपड्यातील आदिवासी भागात विविध शाळांमध्ये व्याख्यानांचे आयोजन केले होते. पारोळा तालुक्यात रामेश्वर भदाणे व गिरीश पाटील यांनी कार्यक्रमांची जबाबदारी घेतली होती. चार महिन्याचे बाळ घरी ठेवून प्रज्ञा शिरुडकर यांनी अमळनेर येथे इंदिरा गांधी शाळेत भाषण दिले तर अमळनेर तालुक्यातील पिंपळी येथे सर्वात मोठ्या सावित्री उत्सवाला संदीप घोरपडे व अशोक बिऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले. भाविका वाल्हे या विद्यार्थिनीने अति उत्कृष्ट सादरीकरण केले . ज्ञानज्योती सावित्रीबाई उत्सवात सुमारे ९५ विद्यार्थी वक्त्यांनी भाषणाच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. युवा कल्याण प्रतिष्ठानचे एकूण १०१ वक्ते विविध शाळांमध्ये व्याख्यानासाठी गेले होते.
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाचा नवा संकल्प…
पाच वर्षात अमळनेर तालुक्यात १००० वक्ते तयार करण्याचा संकल्प युवा कल्याण प्रतिष्ठानने जाहीर केला आहे. ‘घर घर संविधान’ या विषयावर एकाच दिवशी ५०० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प आहे.
प्रा. अशोक पवार, राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान प्रमुख.
क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकविले : श्रीमती आशा महाजन
क्रांतीज्योती एक सुलक्षणी मुलगी, आदर्श गृहिणी, उत्तम विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका, आज्ञाधारक सून, कष्टाळू पत्नी, चौकस व्यवस्थापक, कवयित्री, धुरंदर सत्यशोधक, ज्वलंत समाजसेविका. अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जीवनाविषयी चिंतन करायला शिकविले असे मत युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वक्त्या श्रीमती आशा महाजन यांनी व्यक्त केले. त्या सार्वजनिक विद्यालय, सारबेटे येथे सावित्रीबाई जयंती निमित्त बोलत होत्या.

या अभियानाच्या माध्यमातून सावित्रीबाईंचे जीवन कार्य व कर्तृत्व सुमारे बावीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. पंडीत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील व सर्व विद्यार्थ्यांनी युवा कल्याण प्रतिष्ठानच्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार या अभियानात सहभागी होण्याचा निर्णय प्रा. अशोक पवार यांचे उपस्थितीत जाहीर केला. अभियानात सुमारे १५ महिला वक्त्यांचा समावेश होता. वक्त्यांची कार्यशाळा व वाचन साहित्याचे वाटप ही या अभियानाची खास वैशिष्ट्ये आहेत. प्राथमिक शिक्षिका आशा महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाविषयी तयार केलेले वाचन साहित्य सर्व शाळांना देण्यात आले. अभियानाच्या वक्त्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांचा व सेवानिवृत्तांचाही समावेश होता. हे अभियान माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने अल्प खर्चात राबविले जाते.
