सामाजिक परिवर्तनाकडे एक वेगळं पाऊल…

अमळनेर : तालुक्यातील झाडी येथे एक अनोखा व पहिलावहिला कुटुंब स्नेहमेळावा नुकताच शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी पार पडला. स्नेहमेळाव्यानिमित्त उपस्थित सुवासिनींना हळदी कुंकू करुन संक्रांतीचे वाण देत कुटुंबातील अनोखा व पहिलावहिला कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. विलास पाटील व सौ. डॉ. उज्वला पाटील यांनी केले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एक विधवा, एक कुमारी व एक सुवासिनी महिला यांना स्थान देण्यात आले होते. त्यांच्या हस्ते आई जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्यकारणी सदस्या सौ. वसुंधराताई लांडगे यांनी जिजाऊ वंदना गायली. प्रास्ताविक करताना प्राध्यापक विलास पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. आपल्या गावचा विकास आपण महिलांनीच पुढे होऊन करावा असे आवाहन त्यांनी केले.
सौ. वसुंधराताई लांडगे यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानात सामाजिक प्रबोधन करत स्वानुभव कथन केले. प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती दर्शनाताई पवार यांनी महिलांशी समाज परिवर्तनासाठी हितगुज केले. त्यातून महिलांच्या सार्वजनिक आरोग्याच्या, शिक्षणाच्या अधिकाराच्या महती सांगून स्त्री ही शक्ती असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अनोखे पण म्हणजे कार्यक्रमाच्या प्रारंभी एकल अर्थात विधवा महिलांचा प्रातिनिधीक सन्मान करून भेटवस्तू देण्यात आली. गावातील प्रत्येक जाती समूहातील एक प्रतिनिधी मार्फत सर्व समाजातील उपस्थित महिला सुवासिनींना हळदी कुंकू करुन संक्रांतीचे वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आली. या निमित्ताने गावात सामाजिक सलोखा व स्त्रीत्व, स्त्रीभान टिकून राहावे व यंदापासून हा कार्यक्रम आपण सामाजिक प्रथा म्हणून दरवर्षी साजरा करूया असा संकल्प जमलेल्या सर्व माता भगिनींनी व्यक्त केला. यानिमित्ताने सामाजिक परिवर्तनाकडे एक वेगळं पाऊल आम्ही झाडीतल्या महिलांनी टाकले अशा काही महिलांनी प्रतिक्रिया दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गावातील ज्येष्ठ नेते सुभाष आबा पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला वर्गाने पुढाकार घेतला.