नगरपरिषद प्रशासन लक्ष देईल का ?

अमळनेर : जगप्रसिद्ध मंगळग्रह मंदिरा कडे धरणगाव रस्त्याकडून जाणारा रस्ता निकृष्ट झाला आहे. या रस्त्याच्या मधोमध इलेक्ट्रिक पोल असून तो अपघातास निमंत्रण देत उभा आहे. असंख्य मंगळ भक्त या मार्गाने ये जा करत असतात. साहजिकच पारोळा व चोपडा रस्त्यावरील रहदारी कमी होण्यास मदत होते. या रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचते. परिसरातील गटारी तुंबल्यामुळे रोगराई वाढत आहे. याचप्रमाणे परिसरात असलेली प्रशस्त बाग नगर परिषदेस वर्ग करण्यात आली परंतु येथे कोणत्याही सोयी सुविधा, स्वच्छता नाही. या उद्यानात दिवे, बाक, चेकर्स बसवावेत, काटेरी झुडुपे तोडून स्वच्छता होणे आवश्यक आहे, नगरपरिषदेने तातडीने उपाययोजना करावी म्हणून स्थानिक राहिवाशांनी मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे. मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास येथील रहिवासी कोणताही कर भरणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे.
