प्रेक्षकांच्या साक्षीने अहिराणी भाषेच्या संदर्भातील सहा महत्त्वपूर्ण ठराव करत पाचवं अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप

राज्यभरातील अहिराणी रसिकांनी अहिराणी साहित्य संमेलनाला भरभरून प्रेम दिले यापेक्षा आणखी काय हवं : भगवान पाटील

अमळनेर : अमळनेर येथील अहिराणी साहित्य परिषद धुळे व धनदाई माता एज्युकेशन सोसायटी आयोजित पाचवं अहिराणी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. काल दिनांक 31 मार्च रोजी या संमेलनाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विचार मंचावर सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, सौ. वसुंधरा लांडगे, प्रकाश महाले, गोकुळ बागुल, प्रकाश पाटील, रविंद्र पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, के. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलन समारोपप्रसंगी आयोजन समितीकडून अहिराणी भाषेच्या संदर्भातील खालील सहा महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले. अहिराणी संमेलन समितीचे मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील यांनी ठरावांचे वाचन केले. उपस्थित प्रेक्षकांच्या साक्षीने या सर्व ठरावांना उपस्थित रसिकांनी हात उंचावून अनुमोदन दिले.

  • अहिराणी भाषेचा समावेश महाराष्ट्राच्या राजपत्रित भाषांमध्ये करावा.
  • प्राथमिक स्तरावर मराठी अभ्यासक्रमावर अहिराणी भाषेची ओळख करून द्यावी.
  • अहिराणी भाषेतील एक धडा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात असावा.
  • अहिराणी भाषेतील साहित्यकांसाठी स्वतंत्र पुरस्कार घोषित करावे.
  • अहिराणी भाषेतील पुस्तके साहित्य व ऑडिओ बुक साठी शासनाने स्वतंत्र अनुदान द्यावे.
  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावे.

अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डी. डी. पाटील यांनी वेळ न घेता अमळनेरसह सर्व अहिराणी प्रेमींनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व आयोजन समितीचे आभार व्यक्त केले. अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अहिराणी साहित्य परिषद धुळे व धनदाई माता एज्युकेशन सोसायटी आयोजित अहिराणी साहित्य संमेलनाला राज्यभरातील अहिराणी रसिकांनी भरभरून प्रेम दिले यापेक्षा काय हवं ? अशी भावना व्यक्त केली व सर्व आयोजन समितीचे आभार मानले. समारोपापूर्वी अहिराणी गौरव पुरस्कारासह अहिराणीचा प्रचार व प्रसार करणारे विविध अभिनेते, कलाकार, रील स्टार, लेखक यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मधुकर खैरनार -नकाणे, खान्देशी फॉरेनर अरुण सोनार, विजय जगताप -धुळे, अरुण जाधव -एरंडोल, विद्या भाटिया -धुळे, वसंतराव पाटील -अमळनेर, अहिराणी चित्रपट निर्माता गौतम शिरसाट -नंदुरबार, विठ्ठल चौधरी -वंजारी कपाट, वनमाला बागुल -पुणे, धनंजय चित्ते, ओम भोई -अमळनेर, विश्राम बिरारी, समाधान बेलदार, अंजना बर्लेकर -पुणे,अशोक पाटील -भडगांव आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात कवी रमेश धनगर, कवी शरद धनगर यांच्या कवितांनी वेगळीच रंगत आणली. सूत्रसंचालन प्रा. डॉ.कुणाल पवार यांनी तर आभार बापुराव ठाकरे यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!