एखादे कार्य ‘मी केले..’ म्हणण्यापेक्षा सगळ्या यंत्रणेने आणि नागरिकांनी मिळून केलेलं ते कर्तव्य असतं : आमदार अनिल पाटील

अखेर क्रांतिवीरांगना लिलाताई पाटील व डॉ. उत्तमराव पाटील क्रांतीपर्व स्मारकाचे आमदार अनिल पाटील यांचे हस्ते झाले उद्घाटन

अमळनेर : आपल्याला कार्य करायचं असतं आणि कार्याबरोबर आपल्या कर्तुत्वाची सुद्धा जोड लावायची असते. हे काम मी केले याचं क्रेडिट घेण्याच्या भानगडीमध्ये आणि त्या विचारांपासून आपण कुठे बाजूला सरकत नाही. ‘काम करा आणि विसरा’ अशा स्वरूपाची भूमिका जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण आपलं कार्य कर्तृत्व करायचं असतं. आपण केलेल्या कामामुळे लोकांवर आपण काही उपकार करत नसतो म्हणून ते एखादे कार्य ‘मी केले..’ म्हणण्यापेक्षा सगळ्या यंत्रणेने आणि नागरिकांनी मिळून केलेलं ते कर्तव्य असतं या स्वरुपाची आपली भूमिका असली पाहिजे असे मत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील ढेकू रोडवरील प्रभाग क्रमांक ७ मधील क्रांतिवीरांगना लिलाताई पाटील व डॉ. उत्तमराव पाटील क्रांतीपर्व स्मारकाचे आमदार अनिल पाटील यांचे हस्ते दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहेलगाम हल्ल्यातील ठार झालेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर १ मे रोजी क्रांतिवीरांगना लिलाताई यांची पुण्यतिथी असल्याने बहुचर्चित अशा क्रांतीपर्व स्मारकातील कपड्यात झाकून ठेवलेले क्रांतिवीरांगना लिलाताई पाटील व डॉ. उत्तमराव पाटील यांचे पुतळे खुले करुन आमदार अनिल पाटील यांचे हस्ते पुतळ्यांना पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. सोबत विचारपीठावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी, माजी नगराध्यक्ष विनोदभैया पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, पं. समिती माजी सभापती श्याम अहिरे, माजी नगरसेवक राजू फापोरेकर , विवेक पाटील माजी नगरसेविका ॲड. चेतना पाटील, माजी नगरसेविका गायत्री दीपक पाटील आदी उपस्थित होते.

खरं तर साने गुरुजी शाळेत प्रगणे डांगरी येथील रहिवासी व अमळनेर ते डांगरी स्वातंत्र्यलढा पदयात्रा चे आयोजक यांच्यात नुकतीच दिनांक २२ एप्रिल रोजी संयुक्तपणे पत्रकार परिषद झाली होती. यावेळी सर्वांना एकत्र घेऊन राजकारण विरहित भव्य असा कार्यक्रम घेतला जाईल असे सुतोवाच करण्यात आले होते. मात्र पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले प्रगणे डांगरी येथील नागरिक, क्रांतीपर्व स्मारक निर्मितीसाठी काम केलेले माजी नगरसेवक श्याम पाटील, पुरोगामी विचारांचे काही कार्यकर्ते हेच उद्घाटन कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने दिमाखदार सोहळ्याचे स्वप्न काहीसे अधुरेच राहिले.

आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, थोर क्रांतिकारकांनी त्या काळामध्ये केलेला विचार हा अतिशय महत्त्वपूर्ण होता. पण काळाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडायला लागल्या. म्हणून या महाराष्ट्रामध्ये या स्वरूपाचे कार्यक्रम या स्वरूपाचे स्थळ हे वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. माझ्याकडे या विषयाचा विचार मांडला गेला आणि त्याला योग्य तो प्रतिसाद दिला. क्रांतीपर्व स्मारकाचेअनेक महिने काम चाललं आणि काम चालू असताना कुठे तरी तांत्रिक व स्थानिक अडचणी होत्या. नगरपालिकेने योग्य पद्धतीने या सगळ्यांचा पाठपुरावा घेतला आणि आज क्रांतीपर्व स्मारकाचे उद्घाटन झाले.

क्रांतीपर्व स्मारक निर्मितीसाठी श्याम पाटील यांनी काम केलं आणि कामाचं श्रेय न घेता विसरून गेले याचा अभिमान !

क्रांतिवीरांगना लिलाताई पाटील व डॉ. उत्तमराव पाटील यांच्या क्रांतीपर्व स्मारक निर्मिती करिता ज्यांनी ज्यांनी कष्ट केले ते खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत. मराठा सेवा संघाच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ७७ लाख रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात आले आहे. याबाबत श्याम पाटील यांनी मला विचारलं होतं. त्यांचे विचार फार आवडले. त्यांनी ते काम केलं आणि कामाचं श्रेय न घेता विसरून गेले याचा मला अभिमान वाटतो. त्यांना इथून पुढे या क्रांतीपर्वाला अजून कसं सुशोभित करता येईल ? आणखी कसा पैसा लागेल ? याबाबत येणाऱ्या काळामध्ये आपण अजून आपलं योगदान नक्की देऊ.

आमदार अनिल भाईदास पाटील

स्वातंत्र्यलढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्मितीपासून आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती करिता ज्यांचं ज्यांचं योगदान होतं. स्वातंत्र्य काळानंतर वा स्वातंत्र्यापूर्वी जे काही हुतात्मे किंवा क्रांतिकारक यांचे जे योगदान असेल याची उजळणी करणार आहोत. या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून २७ तारखेपासून एक मंगल कलश यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. आमदार अनिल पाटील यांचे नेतृत्वामध्ये मंगल कलश उत्तर महाराष्ट्र मध्ये घेऊन जायचं असल्यामुळे चिमठाण्याला ज्या ठिकाणी खजाना लुटला गेला.. त्या खजानाची माती घेऊन ही मंगल कलश यात्रा निघेल. बोरी नदी, तापी नदी या आपल्या जीवनवाहिनी आहेत त्या जीवनवाहिन्यांचे जल सुद्धा आपण अमळनेर मधून २६ तारखेला घेऊन २७ तारखेला मुक्ताईनगर पासून यात्रा सुरू करणार. २८ तारखेला अमळनेर मधून नंदुरबारला जाणार आहोत. नंदुरबार नंतर धुळ्यापासून पढे जाऊन जवळपास चार दिवस महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या ज्या घडामोडी झालेल्या होत्या त्या सर्व घडामोडींची उजळणी मुंबईला होईल. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागांमध्ये अशा स्वरूपाचे कलश होऊन त्याची कार्यपूर्ती होणार. त्यात आपापल्या भागामध्ये ज्यांनी ज्यांनी अशी कार्य केलेली होती त्याची उजळणी सुद्धा महाराष्ट्राच्या या व्यासपीठावर नेण्याचं काम केले जाईल. आपल्या सगळ्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्यायचंय असे सांगून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भुजबळ पाटील, बन्सीलाल भागवत गुरुजी, संदीप घोरपडे, बी. के. सूर्यवंशी, मनोज पाटील, पराग पाटील, विनोद कदम, प्रा. सुरेश पाटील, प्रा. मंदाकिनी भामरे, माजी पं. स. सदस्या जयश्री पाटील, जे. के.पाटील, प्रताप शिंपी, नरेंद्र संदानशिव, दिपक पाटील, राजेश पाटील, एच. सी. तेले, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते. शेवटी पत्रकार संजय पाटील यांनी आभार मानले.

पटेल ते करा… मात्र यात्रेचे चांगलं नियोजन हवं…

अमळनेर च्या दृष्टीने वैभवशाली अशी संत सखाराम महाराजांची यात्रा लवकरच येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी न. पा. मुख्याधिकारी यांना सूचना केल्या. सध्या पाण्याची समस्या उद्भवत असून पाण्याची समस्या कशामुळे ? काही गोष्टी जनतेला माहिती नसतात. कल्पना नसते की पाईपलाईन ला काय झालं असेल, मध्येच कोणी रस्ता करणारा असेल, जिओ लाईन टाकणारा असेल, तो येतो आणि कधीतरी काम चालू करतो. कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या काळामध्ये अशा समस्या उद्भवू नये. संत सखाराम महाराज यात्रेच्या अगोदर तालुक्यामध्ये पाण्याची समस्या राहायला नको. यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्या, काळजी घ्या. तुम्हाला पटेल ते करा मात्र तातडीने यात्रेचे चांगलं नियोजन झाले पाहिजे. अमळनेरकरांसाठी ४-५ दिवसांनी मिळणारे पाणी दररोज किमान तासभर कसे देता येईल ? याबाबत नियोजन सुरू आहे. ती देखील एक जलक्रांती असणार आहे असे आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांच्या साक्षीने सांगितले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!