भक्तांची सुरक्षा ,भावना आणि श्रद्धेचा विचार करून संस्थानने घेतला निर्णय

अमळनेर : प्रति पंढरपूर असलेल्या अमळनेर मधील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला २७५ वर्षांची परंपरा आहे. सर्व जाती धर्म यांना सामावून घेणारा आणि प्रत्येक घटकाला यथोचित सन्मान देऊन साजरा होणारा हा उत्सव असल्याने या उत्सवातून संपूर्ण महाराष्ट्रात ऐक्याचा संदेश जात असतो. म्हणूनच दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी, वैचारिक ठेवा घेऊन जाण्यासाठी येत असतात. परंपरेप्रमाणे रथ आणि पालखी मिरवणूक सर्व समाज सोबत घेऊन काढल्या जातात. दोराला हात लावून रथ ओढण्याची श्रद्धा आहे. यावर्षी संस्थान ने परंपरा कायम राखत, सर्वांना पूर्वीप्रमाणेच यथोचित सन्मान देत रथ मिरवणुकीत किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील सर्व भाविकांची सुरक्षा ,भावना आणि श्रद्धेचा विचार करून परंपरेप्रमाणे सुरुवातीला दोराने काही अंतर रथ ओढून नंतर ट्रॅक्टरने रथ ओढला जाणार आहे. भक्तांनी व भाविकांनी सहकार्य करून लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.
प्रत्येक भाविकाला रथाला स्पर्श करून दर्शन घेता यावे, रथाला प्रदक्षिणा घालता यावी हा प्रमुख उद्देश यामागे आहे. ओढणाऱ्यांच्या गर्दीत आणि ओढताणीत धक्का बुक्की होते, नीट दर्शन घेता येत नाही, महिलांना असुरक्षेची भावना निर्माण होते. खिसे कापू,चेन स्नॅचिंग करणारे गैरफायदा घेतात. पोलीसांवरील ताण वाढतो, सेवेकरींवर भार पडतो. या सर्व बाबीतून सुरळीत आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे लहान मुले, महिला, वृद्ध, दिव्यांग प्रत्येक भक्ताला आपल्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दर्शन घेता येईल, प्रदक्षिणा घालता येईल म्हणून रथ ट्रॅक्टरने ओढून नेला जाईल. जागेवर पुन्हा दोराने रथ स्थानावर नेण्यात येईल. यात्रोत्सवात दिला जाणारा मान सन्मान पूर्वीप्रमाणेच प्रत्येक समाजाला मिळणार आहे. त्यामुळे परंपरेत कोणताही बदल झालेला नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यावी. तरी सर्व भाविक भक्तांनी बिनधास्तपणे रथाचे दर्शन घ्यावे, भक्तीचा व यात्रोत्सवाचा आनंद लुटावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती संस्थान तर्फे करण्यात आली आहे.