झाडी येथील ग्रामसेवकाचा अतिरिक्त प्रभार काढून त्यांचे जागी नवीन ग्रामसेवक नेमण्याची मागणी

अमळनेर : तालुक्यातील झाडी ग्रामपंचायतच्या भ्रष्ट व गैरकारभाराला कारणीभूत सरपंच, ग्रामसेवक व सत्ताधारी सदस्यांच्या मनमानी विरुद्ध काही सदस्य व ग्रामस्थांसह २६ जानेवारी २०२३ रोजी उपोषणाला बसले होते. नियमित मासिक सभा न होणे, ग्रामसभा न घेणे, आर्थिक व्यवहारात अफरातफर करणे, बनावट दस्तऐवज निर्माण करणे, शासनाची फसवणूक करणे, संशयित अपहार, ग्रामसेवकांची अनुपस्थिती, गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसणे, स्वच्छतागृहे मुताऱ्यांची अस्वच्छता, दोन वर्षापासून तुंबलेल्या अवस्थेतील गटारी अशा अनेक समस्यांना कंटाळून ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी उपोषणे, निवेदने, तक्रारी वरिष्ठ प्रशासन म्हणून पंचायत समिती व जिल्हा परिषदेला वारंवार केल्या आहेत. झाडी येथे सुकलाल मालचे ग्रामसेवक आहेत. त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार आहे. त्यांच्याकडून तो अतिरिक्त प्रभार काढून त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक देण्यात यावा अशी वारंवार मागणी करण्यात आली. तरीही त्याकडे लक्ष दिले गेले नाही.
प्रशासनावर ग्रामस्थांचा आरोप…
गेंड्याच्या कातडीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रशासनाला एक साधी चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची तसदी देखील घ्यावीशी वाटली नाही. विशेष म्हणजे सुशांत पाटील, किशोर शिंदे, आय.ए.एस.अधिकारी अर्पित चव्हाण आणि आताचे एन. आर. पाटील तसेच दरम्यान अजून दोन अधिकारी येऊन गेले पण या महाशयांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. याचे कारण म्हणजे ग्रामपंचायतीला संरक्षण पंचायत समितीचे, पंचायत समितीला संरक्षण जिल्हा परिषदेचे, जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांना संरक्षण सीईओंचे असा भोंगळ कारभार आम्हाला आज सर्व दूर पहावयास मिळतो आहे.
तक्रारीवर वेळोवेळी दाद मागूनही दखल न घेतल्याने त्याचा निषेध म्हणून काल दिनांक २९ एप्रिल रोजी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अमळनेेर पंचायत समिती गाठून तेथे बीडीओ एन. आर. पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रशासनाचे लाडके विद्यमान ग्रामसेवकाची प्रतिमा भेट देत गांधीगिरी सत्कार केला. आता तरी प्रशासनाला जाग येऊन आजपर्यंतच्या सर्व तक्रारीवर कार्यवाही होईल व आमच्या गावाला चांगला नियमितपणे येणारा पारदर्शी ग्रामसेवक मिळेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य निंबा लोटन पाटील, माजी सदस्य दिनेश सुभाष पाटील, दरबारसिंग पाटील, व्यंकट पाटील, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
