खड्डे त्वरीत बुजवण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

अमळनेर : शहरातून जाणाऱ्या मुख्य राज्यमार्ग क्रमांक ६ वर मोठा खड्डा पडला असून बांधकाम विभागाने अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अखेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी यात वृक्षारोपण करीत खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नुकतीच केली आहे. अमळनेर शहरातूनच राज्यमार्ग ६ जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून अमळनेर कडून बेटावद कडे जातांना अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यातच शहरातून जाणाऱ्या या रस्त्यावर अजय केले यांच्या घराजवळ वळणावरच खूप मोठ्ठा खड्डा पडला असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहने खड्ड्यात पडून वाहनांचे नुकसान होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
अमळनेर ते शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार या भागाकडे येण्या जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. दिवसाला हजारो वाहनधारक या रस्त्याने ये- जा करत असतात. मागील ४ – ५ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यावरील हा खड्डा पाण्याने भरला असून या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत. रस्त्याला वर्ष ही पूर्ण झाले नसून ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या राज्यमार्गावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असून ठेकेदाराला मेंटेनन्स कालावधी दिलेला असतो. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ठेकेदाराचे दोष झाकून नागरिकांना त्रास होऊ देत आहेत. हा खड्डा पावसाळ्याआधी बुजविण्यात यावा यासाठी काँग्रेस तर्फे उपहासात्मक वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बी. के.सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, शरद पाटील, गजेंद्र साळुंखे, के. व्ही. पाटील, प्रताप पाटील, दिलीप पाटील, पी. वाय पाटील, तुषार संदानशिव, भगवान संदानशिव, विठ्ठल पवार, प्रमोद पाटील, राजू भाट, बापुराव पाटील, मोहम्मद तेली, मनोहर पाटील, विलास पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.